मेगास्टार कलावंत आणि त्यांचा बहुचर्चित चित्रपट याची चर्चा नेहमीच होत असते. ‘षमिताभ’ या चित्रपटाच्या शीर्षकामुळेच कुतूहल निर्माण झाले होते. मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा चित्रपटातील प्रमुख
बॉलीवूडमध्ये ‘नशीब काढायला’ येणाऱ्या असंख्य लोकांसारखा आणखी दानिश नामक एक तरुण इगतपुरीहून येतो, स्टार बनतो आणि ‘स्टारडम’ मिळवितो. या कलावंताला ‘स्टार’ बनण्यासाठी चित्रपटातील अमिताभ मदत करतो. पण ही अनोख्या स्वरूपाची मदत तो करतो. मदत म्हणण्यापेक्षा अमिताभ सिन्हाच्या मदतीशिवाय हा तरुण बॉलीवूडमध्ये ‘स्टार’ बनू शकत नाही, ‘स्टार’ म्हणून मिरवू शकत नाही, वावरू शकत नाही. असे हे अनोखे बंधन दोघांमध्ये आहे. अहंकार, अस्तित्त्व, नकार-स्वीकार, यश-अपयश यांचा जीवनातील खेळ माणसाला निरनिराळी सोंगं घ्यायला लावतो, परिस्थितीला शरण जाणे एवढेच कधी कधी माणसाच्या हातात उरते, अशा सगळ्या भावभावना चित्रपटांतील प्रमुख दोन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दिग्दर्शकाने खुबीने मांडल्या आहेत.
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची उंची, त्यांचा अभिनय, बॉलीवूडवरचा प्रदीर्घ काळ असलेला वरचष्मा, मुख्य म्हणजे त्यांचा आवाज या सगळ्याचा बॉलीवूडसह सर्व भारतीय प्रेक्षकांच्या मनावर असलेला पगडा याचा सिनेमात दिग्दर्शकाने केलेला उपयोग लाजवाब म्हणावा लागेल. तर दुसरीकडे अगदी किरकोळ दिसणारा, चेहरा आकर्षक नसलेला परंतु उत्तम अभिनेता असलेला धनुष याच्यासारखा कलावंत यांची निराळ्या धाटणीची जुगलबंदी हा या सिनेमाचा महत्त्वाचा आकर्षण िबदू ठरला आहे.
एके ठिकाणी अमिताभ एका चित्रपटाची पटकथा वाचून म्हणतो हा ‘पिक्चर’ नव्हे ‘मिक्स्चर’ आहे. अशा संवादातून दिग्दर्शकाने खुबीने बॉलीवूड चित्रपटांवरही भाष्य करण्याचा झकास प्रयत्न केला आहे. हिंदी सिनेमातील अनेक कलावंतांनी विशिष्ट पाश्र्वगायकांचे आवाज घेतले. शम्मी कपूर आणि मोहम्मद रफी हे समीकरण चांगलेच लोकप्रिय ठरले होते. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एका कलावंताने सुरुवातीपासून सुपरस्टार बनेपर्यंत आणि त्यानंतरही कायमस्वरूपी दुसऱ्या माणसाचा आवाज वापरणे आणि त्या आवाजाच्या जोरावर ‘स्टार’पद मिळविणे आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणे ही अनोखी कल्पना आणि त्यातून साकारलेली चित्रपटाची पटकथा हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. आपला आवाज दानिशला दिल्यानंतर आणि चित्रपटातील भूमिकांसाठी दानिशचे नवे नामकरण होणे आणि त्या नावाला अल्पावधीत लोकप्रियता मिळणे या बॉलीवूडच्या खूप आधीपासून रूढ झालेल्या संकल्पनेचा चमकदार वापर या दिग्दर्शकाच्या कल्पकतेला निश्चितच दाद द्यायला हवी. अक्षरा हसनने अक्षरा पांडे ही प्रमुख भूमिका साकारली असली आणि धनुष-अमिताभ बच्चन यांच्यातील ती महत्त्वाचा दुवा बनली असली तरी तिच्या अभिनयाची झलक या चित्रपटात पाहायला मिळत नाही.
दानिश-अमिताभ सिन्हा या व्यक्तिरेखांमधील संघर्ष दाखविण्यात आला असला तरी असे प्रसंग खूप कमी असल्यामुळे चित्रपट कमी रंजक ठरतो. परंतु, दोन्ही कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी निश्चित पाहायला मिळते आणि अमिताभ बच्चन यांचा अनोखा आवाज हा चित्रपट संपला तरी कानात घुमत राहतो. किंबहुना हेच चित्रपटाचे यश म्हणता येईल.
लाजवाब ‘क्रॉस कनेक्शन’
मेगास्टार कलावंत आणि त्यांचा बहुचर्चित चित्रपट याची चर्चा नेहमीच होत असते. ‘षमिताभ’ या चित्रपटाच्या शीर्षकामुळेच कुतूहल निर्माण झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-02-2015 at 03:05 IST
TOPICSशमिताभ
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shamitabh review