कलाकारांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण हा चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.आता स्टार किड्सही बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.आलिया भट्ट, अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर या स्टार किड्सने बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करत अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली.अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया ‘बेधडक’ या चित्रपटातून लक्ष आणि गुरफतेह पिरजादा यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
अलिकडेच शनायाचा चित्रपट ‘बेधडक’ कदाचित लांबणीवर अशी चर्चा होती. मात्र आता स्टार किडचे वडील आणि अभिनेते संजय कपूर यांनी चित्रपट ट्रॅकवर असल्याचे उघड केले. ईटाइम्सला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, संजय म्हणाले “शनाया या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग करेल.” या वर्षीच्या मार्चमध्ये निर्मात्यांनी बेधडकच्या पोस्टरचे अनावरण केले होते. बेधडकची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ‘बेधडक’ चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात येणार आहे. या तिघांनी अभिनयाच्या अनेक कार्यशाळांना हजेरी लावली आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर जाऊन तीन मुख्य पात्रांची ओळख करून दिली आहे. शशांक खैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. शशांकने याआधी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, धडकसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
शनाया पहिल्या चित्रपटापूर्वी या वर्षी लॅक्मे फॅशन वीक २०२२ मध्ये मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक करताना दिसून आली होती. तिने २०२० मध्ये चुलत बहीण जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिने करिअरची सुरुवात केली होती.