एखाद्या व्यक्तीमध्ये खास प्रतिभा असल्यास ती लपत नाही असं म्हणतात. प्रसिद्ध संगीतकार, गायक शंकर महादेवन एका अशाच प्रतिभेने अचंबित झाले आहेत. एका कार्यक्रमात महादेवन यांची एका वायुदल अधिकाऱ्याशी भेट झाली आणि त्या अधिकाऱ्याच्या गायनाने ते मंत्रमुग्ध झाले. शंकर महादेवन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

शिलाँग इथल्या एका कार्यक्रमात जाण्यापूर्वी ते गुवाहाटीला थांबले होते. तिथे ते विंग कमांडर कृष्णकुमार यांना भेटले. वायुदलातील इतर अधिकाऱ्यांसोबत ते तिथे थांबले होते. कृष्णकुमार यांच्या गायनाने प्रभावित झालेल्या महादेवन यांनी हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ते कृष्णकुमार यांची ओळख करून दिल्यानंतर त्यांना गाण्याची विनंती केली. के. जे. येसुदास यांच्या ‘जब दिप जले आना’ हे गाणं कृष्णकुमार यांनी गायलं आणि महादेवन यांनीसुद्धा गाण्यात साथ दिली.

Big salute & I was fortunate to meet Wing Commander Krishnakumar!!!
It gives me immense happiness & pleasure to meet and be able to connect with such beautiful and talented individuals from across our country… Lovely. Just watch him sing! #UndiscoveredWithShankar

‘अशा प्रतिभावान व्यक्तींना भेटून मला अत्यंत आनंद झाला,’ असं महादेवन यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधीही बेंगळुरूतील दोन हॉटेल कर्मचाऱ्यांच्या गाण्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रवासात, कार्यक्रमादरम्यान किंवा अन्य ठिकाणी उत्तम गाणारी लोकं भेटल्यास शंकर महादेवन आवर्जून त्यांचा व्हिडिओ शूट करतात आणि #UndiscoveredWithShankar या हॅशटॅगसोबत तो सोशल मीडियावर पोस्ट करतात.