‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेता शंतनू मोघेनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या मालिकेला व त्यातील कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. एका रिक्षाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील शंतनूचा फोटो लावण्यात आला होता. शंतनूने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केला.
‘कामाची पावती अशी ही.. जनमानसाचा पुरस्कारच जणू.. स्वरुप वेगळं. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाज महाराज यांची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझं अहोभाग्य. मायबाप रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. तेव्हा अनेक मित्र मैत्रिणींनी असे फोटो मला पाठवले. वेगवेगळ्या ठिकाणी, ट्रॅफिकमध्ये असताना रिक्षावर दिसलेलं हे चित्र. मनोमन सुखावून गेलो. मनात आलं, आपल्यालासुद्धा हे चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळेल का? आणि एकेदिवशी मी सिग्नलवर गाडीत असताना प्रियाने मला अचानक समोरची रिक्षा दाखवली. पटकन गाडीतून उतरलो आणि एक फोटो काढला. हा मोह आवरू शकलो नाही. डॉ. अमोल कोल्हे, तू माझ्यावर दाखवलेला विश्वास, टीम स्वराज्यरक्षक संभाजीची अविरत मेहनत, झी मराठीची समर्थ साथ आणि सुजाण रसिकांचं प्रेम.. तुमचा सदैव ऋणी आहे’, अशा शब्दांत शंतनूने कृतज्ञता व्यक्त केली.
View this post on Instagram
दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिकेने फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. यावेळी मालिकेच्या टीमसोबतच प्रेक्षकसुद्धा भावूक झाले होते.