सध्या सुरु असणाऱ्या निरनिराळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लेखक-दिग्दर्शक शंतनू रोडे यांचा ‘जयजयकार’ हा मराठी चित्रपट यातील कथाविषयामुळे आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत आला आहे. लेखक म्हणून परिचित असणारे शंतनू रोडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच लक्षवेधी कामगिरी केली असून अनेक पारितोषिकांवर यशाची मोहोर उमटविली आहे.
‘जयजयकार’ चित्रपटात तृतीय पंथीयांमधील गुण हेरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते आणि तृतीयपंथीदेखील सर्वसामान्यप्रमाणे जीवन जगू शकतात हा विचार वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. वेगळा विषय,अभिनयसंपन्न कलाकार आणि लेखक दिग्दर्शक शंतनू रोडे यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे हा सिनेमा अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्त्सवांमध्ये परीक्षकांचे विशेष लक्ष वेधत आहे. गोव्याच्या ‘फिल्म बझार फेस्टीवल’ च्या व्हुविंग रूम रिक्मेंडस सेक्शनमध्ये ज्युरींनी देशभरातल्या विविध भाषांमधील चित्रपटांमधून निवडलेल्या २२ चित्रपटांमध्ये ‘जयजयकार’ या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. ‘कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शनासाठी शंतनू रोडे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून संजय कुलकर्णी यांना गौरविण्यात आले तर ‘जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये देखील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शनासाठी पारितोषिक मिळाले आहे. याशिवाय ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मधील आजचा मराठी सिनेमा सेक्शनमध्ये, ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल’, ‘पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये या सिनेमाची निवड झाली आहे.
‘सांगली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये ‘जयजयकार’साठी दिलीप प्रभावळकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ अशा दोन पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच ‘नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये या चित्रपटाला एल.जी.बी.टी विषयावर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन कॅमेरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रदर्शनापूर्वीच विविध महोत्सवांमध्ये या मराठी सिनेमाला मिळालेला बहुमान उल्लेखनीय असून अजून अनेक महोत्सवांमध्ये सहभाग घेणार आहे. ‘जयजयकार’ चित्रपटात तृतीयपंथीयांचा प्रश्न विनोदी अंगाने, हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळण्यात आला आहे. सकारात्मक विचार मांडणाऱ्या या चित्रपटात प्रश्नासोबत उपाय देखील सांगण्यात आला आहे हे विशेष. दिलीप प्रभावळकर, सुहिता थत्ते, संजय कुलकर्णी, भूषण बोरगांवकर, धवल पोकळे, आकाश शिंदे या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. येत्या १३ जूनला ‘जयजयकार’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये शंतनू रोडेंचा जयजयकार
सध्या सुरु असणाऱ्या निरनिराळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लेखक-दिग्दर्शक शंतनू रोडे यांचा 'जयजयकार' हा मराठी चित्रपट यातील कथाविषयामुळे आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत आला आहे.
First published on: 30-05-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shantanu rodes jayjaykar in international film festival