श्रुती कदम
‘रामायण’ हे महाकाव्य कथा, चित्रपट, मालिका, कार्टुन अशा विविध माध्यमांतून आजवर प्रेक्षकांनी अनुभवले आहे. लहान मुलांसाठी खास राम आणि हनुमानाच्या आख्यायिका सांगणारे अनेक अॅनिमेटेड चित्रपट प्रदर्शित झाले आणि गाजलेही. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या आणि बच्चेकंपनीत लोकप्रिय ठरलेल्या ‘द लेजेंड ऑफ हनुमान’ या अॅनिमेटेड मालिकेचा तिसरा भाग लवकरच ‘हॉट स्टार’ या ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसऱ्या भागात हनुमान आणि रावण यांच्यातील महायुद्ध दाखवण्यात असून या भागात रावण या पात्रासाठी अभिनेता शरद केळकर यांनी आवाज दिला आहे. यानिमित्ताने शरद केळकर यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
आपल्या देशात एखाद्या पात्राला आवाज देणे (व्हॉइस ओव्हर) आणि वाचिक अभिनय (व्हॉइस अॅिक्टग) यामधील फरक फार कमी लोकांना माहिती असतो. ‘द लेजेंड ऑफ हनुमान’ या मालिकेच्या निमित्ताने मला वाचिक अभिनय करण्याची संधी मिळाली. आम्ही हा तिसरा भाग आधी रेकॉर्ड करून घेतला. त्यानंतर याचे अॅनिमेशन करण्यात आले, अशी माहिती शरद यांनी दिली. या मालिकेचा तिसरा भाग रावणावर आधारित आहे. त्याचे त्याच्या भावंडांसोबत असलेले नाते, तो त्यांच्या शत्रूंबरोबर कसे वागत होता. त्याची महदेवाबद्दलची आस्था हे सगळं तपशीलवार या अॅनिमेटेड मालिकेत दाखवण्यात आलं आहे. या ‘द लेजेंड ऑफ हनुमान’ मालिकेच्या निमित्ताने मला रामायण, रावण यांच्याबद्दल खोलात जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळाली. मालिकेच्या लेखकाने अभ्यासपूर्वक मांडणी करत सुंदर लेखन केलं असल्याने हे पात्र साकारताना मजा आली, असेही शरद यांनी सांगितले.
हेही वाचा >>>Video : ‘ओले आले’चा नेमका अर्थ काय? कलाकारांनीच केला खुलासा, पाहा विशेष मुलाखत
अभिनयाबरोबर व्हॉइस ओव्हर क्षेत्रात काम करायला कशी सुरुवात झाली याबद्दल बोलताना, ‘मी मालिकांमध्ये काम करत असताना अनेक वेळा डिबग करण्यासाठी जायचो. तेव्हापासून व्हॉइस ओव्हर करायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली’ असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मी विचार केला भविष्यात जर चित्रपटात काम करायचं असेल तर डिबग करता येणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मोना शेट्टी यांना भेटलो आणि हळू हळू लहान पात्रांसाठी व्हॉइस ओव्हर करायला सुरुवात केली. त्यामुळेच मला ‘बाहुबली’ या चित्रपटासाठी व्हॉइस ओव्हर करण्याची संधी मिळाली. प्रत्येक संधीचा योग्य फायदा घेता आला पाहिजे, हे मी त्या अनुभवातून शिकलो, असे सांगतानाच आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात आली ते म्हणजे प्रत्येक कलाकाराला गोष्ट सांगता आली पाहिजे, कारण त्यामुळे पात्र रंगवण्यास मदत होते, असेही शरद यांनी सांगितले.
नव्या संसद भवनासाठी खास केलेल्या व्हिडीओलाही शरद यांचाच आवाज होता. या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, नवीन संसद भवन तयार झालं तेव्हा त्यासाठी अनेक कलाकारांनी आवाज चाचणी दिली होती. त्यातून माझ्या आवाजाची निवड झाली. माझ्यासाठी ही फारच अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा देशासाठी काही तरी करण्याची संधी मिळते आणि आपल्या कामाचे सगळीकडे कौतुक होते त्याचा आनंद आगळाच असतो.
हेही वाचा >>>चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘अॅनिमल’ ओटीटीवर होणार प्रदर्शित; वाचा कुठे व कधी पाहता येणार?
अभिनेता प्रभाससाठी आवाज देताना कोणती काळजी घ्यावी लागते याबद्दल ते म्हणतात, ‘प्रत्येक कलाकार जेव्हा अभिनय करतो तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर ते पात्र साकारत असते. आपल्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्यापात्रासारखे कलाकार वागत असतो. मी व्हॉइस ओव्हर करताना या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करतो. प्रभासचा एक वेगळा अंदाज आहे. त्यांची उभी राहण्याची, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्याचा अभ्यास करूनच मी त्यांना व्हॉइस ओव्हर देऊ शकतो. त्यांच्या पद्धतीने आवाजात वेगळेपण आणावा लागतो, त्यांचे स्वर कसे लागतात त्यानुसार आपला आवाज तयार करावा लागतो. नाहीतर मोठय़ा पडद्यावर त्यांचा अभिनय आणि माझा आवाज एकसारखा वाटणार नाही. त्यासाठी मी कायम दक्षता घेऊन अभ्यासपूर्वक व्हॉइस ओव्हर देतो’.
‘व्हॉइस ओव्हर’ क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी नेहमी आपण कोणाचे पात्र साकारत आहोत आणि त्या पात्राचा अभिनय कोणत्या कलाकाराने केला आहे त्या व्यक्तीनुसार आपल्या आवाजावर काम करणे गरजेचे आहे. त्या कलाकाराच्या शरीराची ठेवण कशी आहे? तो कलाकार कसा बसतो, कसा चालतो या सगळय़ाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अन्यथा पडद्यावरची व्यक्तिरेखा सौम्य आहे आणि आवाज भारदस्त आला तर ते फार विचित्र दिसते. त्यामुळे याची काळजी प्रत्येक कलाकाराने घेतली पाहिजे.
-शरद केळकर