अशोक सराफ यांना आज नाट्यपरिषदेकडून पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते मिळाल्याचा आनंद आपल्याला झाला आहे शरद पवार माझे आवडते नेते आहेत असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी शरद पवारांच्या स्मरणशक्तीचंही त्यांनी कौतुक केलं आहे. नाटककार गो. ब. देवल स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अशोक सराफ यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अशोक सराफ?
“फणसाळकर साहेब या जमातीने माझ्यावर प्रेम केलं आहे. पोलीस कुठेही मी अडकलो तरीही मला सोडून देतात. एकदा कार चालवत होतो, तेव्हा माझ्यापुढे टॅक्सी होती. त्या टॅक्सीने एकाला उडवलं. मी त्या माणसाला रुग्णालयात घेऊन गेलो. पोलिसांनी केस घेतली, रुग्णालयात डॉ. खेर म्हणून होते. त्यावेळी पोलीसही रुग्णालयात आले, मला म्हणाले तुम्हाला चौकीत यावं लागेल. ताडदेव पोलीस स्टेशनला गेलो. तेवढ्यात एक पोलीस उपनिरीक्षक आले. मला म्हणाले, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तो एक वर्षाचा आहे. तुम्ही येता का? मी तिकडे गेलो आणि त्या मुलाला पेढा भरवला. नंतर येऊन परत पोलीस ठाण्यात बसलो. ९ ते १० वाजले. त्या ठिकाणी मला तीन हजार लोक बघायला आले होते.” ही आठवणही अशोक सराफ यांनी सांगितली.
महाराष्ट्र भूषण मिळाला तेव्हा वाटलं की..
माझ्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे. आज लायनीत मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. पुरस्कार कुठून मिळतात? कुणाच्या हस्ते मिळतात ते महत्त्वाचं आहे. शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला तेव्हा मी थोडं काही तरी काम केलं आहे असं जाणवलं. त्यानंतर दिल्लीत संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि मग मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. आजचा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते मिळाल्याचा विशेष आनंद आहे. असं म्हणत त्यांनी शरद पवारांची आठवण सांगितली.
हे पण वाचा- मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर! अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांचा होणार सन्मान
शरद पवार हे माझे आवडते नेते
शरद पवार हे माझे आवडते नेते आहेत. लोकांना माझी कला आवडली, त्यामुळे मी काम करत गेलो. शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद आहे. शरद पवारांकडे एकदा माझं एक काम होतं. त्यांनी फक्त तीन मिनिटांत ते काम केलं. माझा विश्वास नव्हता, मी म्हटलं तुम्ही तिकडे बोला, ते म्हणाले काम झालंय. खरंच ते काम झालं होतं. अजूनही ते प्रत्येकाला नावाने ओळखतात. मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ते हसले त्यावेळी ते मला ओळखतात हे समजलं. दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा गर्दी होती त्यातही त्यांनी मला ओळखलं. शरद पवारांनी बरंच काम करुन ठेवलं आहे. असंही अशोक सराफ म्हणाले.