मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज कलाकारांमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव आदराने घेतलं जातं. आपल्या कामाप्रती एकनिष्ठ असलेल्या शरद पोंक्षे यांना २०१८ च्या डिसेंबरमध्ये कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर कित्येक महिने त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि नव्या जोमाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच त्यांची मुलगी सिद्धीने तिच्या वडीलांना झालेले कर्करोगाचे निदान आणि त्यावेळी असलेली परिस्थिती याबद्दल भाष्य केले.
शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी ही वैमानिक आहे. नुकतंच तिने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी तिच्या वैमानिक होण्याबद्दलच्या प्रवासाबद्दल सांगितले. यावेळी ती म्हणाली, “मला लहान असल्यापासूनच वैमानिक व्हायचं होतं. मी थोडी मोठी झाल्यानंतर आपण वैमानिकच व्हायचं असा मनाशी ठाम निश्चय केला. मी याबद्दल कुटुंबियांनाही सांगितलं होतं. या प्रत्येकवेळी बाबांनी कायम माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला. इतकंच नाही तर मला स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी सर्व मदत त्यांनी केली.”
आणखी वाचा : “बाबांच्या या विचारसरणीमुळे…” शरद पोंक्षेंवर होणाऱ्या टीकेबद्दल लेकीने दिले स्पष्ट शब्दात उत्तर
“मी बारावीत मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असताना बाबांना कर्करोग झाल्याचं निदान झालं. ते ऐकल्यानंतर आम्ही सर्वजण खूप हादरुन गेलो होतो. कारण आपण प्रत्येकजण लहान असल्यापासूनच कर्करोग हा वाईट असतो हेच मनात होतं. पण बाबांच्या सकारात्मक विचारांमुळे आम्ही त्या खडतर परिस्थितीमधून बाहेर आलो. बाबा रुग्णालयात असताना मी तिथं जाऊन अभ्यास करायचे. त्यानंतर ते घरी आले, तेव्हा मी घरात राहून अभ्यास केला. त्यामुळे त्यांची काळजी घेता आली”, असेही सिद्धीने म्हटले.
“बाबांचा कॅन्सर आणि माझी बारावी अशी तारेवरची कसरत त्यावेळी सुरु होती. त्या काळात घेतलेल्या मेहनतीचं फळ मिळालं. मी ८२ टक्के गुण मिळवून मी उत्तीर्ण झाले. त्यानंतर मी लगेचच वैमानिक होण्याच्या कोर्सला जाण्याचा निर्णय घेतला. मग त्यासाठी आवश्यक त्या परीक्षा यशस्वीरित्या पास केल्या. मग आता मी ज्या प्रशिक्षण संस्थेत शिकते आहे, तिथं अर्ज केला. त्यानंतर माझी निवड झाली”, असेही तिने सांगितले.
आणखी वाचा : “तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
दरम्यान शरद पोंक्षे हे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत. तर त्यांची मुलगी सिद्धी ही प्रायव्हेट विमानाची पायलट झाली आहे. असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली, अशी पोस्ट शरद पोक्षेंनी केली होती.