लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या चहुबाजूने चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, त्यामुळे त्याच्या कामाचं कौतुक होतं आहे. पण दुसऱ्याबाजूला ‘छावा’ चित्रपटानंतर सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण झाले आहेत. याच वादाविषयी अभिनेते शरद पोंक्षे यांनी परखड मत मांडलं आहे.

शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “नमस्कार, ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सगळा हिंदू समाज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नितांत प्रेम करणारे सगळे अचानक एकवटले. हिंदूंना एक होण्यासाठी काहीतरी कारण लागतं. आपण सगळे एकवटलो, चित्रपट खूप चालायला लागला आणि त्याच्यावर वाद-विवाद सुरू झाले. मग वंशजांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. दोन्हीकडून वाद प्रतिवाद सुरू झाले. मारामारी सुरू झाली. भांडणं सुरू झाली. पण या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट राहूनच गेली. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून जे हाल केले. म्हणजे क्रूरतेचं शेवटचं टोक गाठलं तो औरंग्या मात्र बाजूलाच राहिला.”

पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, खरंतर सिनेमा बघितल्यानंतर जसं सध्या काही घडलं तर एखाद्या नेत्याच्या फोटोवर चप्पला वगैरे मारतात, थुंकतात, असे प्रकार घडतात. तसंच खरंतर औरंगजेबाच्या प्रतिमेवरती चप्पला मारायला हव्या होत्या. त्याचे पुतळे ठिकठिकाणी हिंदूस्थानमध्ये जाळले जातायत, असं चित्र दिसायला हवं होतं. दिसलं काय?, मराठा विरोध ब्राह्मण समाज.”

“मराठे म्हणणार, आमचे पूर्वज असे नव्हते. तुमच्या ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं. मग ब्राह्मण म्हणणार, आमच्याकडे दोन-चार होते. तुमच्या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचं नुकसान केलं. ते जास्त गद्दार होते. मग मराठे म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केलाय. नंतर ब्राह्मण म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केला. या सगळ्या भानगडीत एक विसरून जातोय औरंग्या बाजूलाच राहितोय.”

“औरंग्याबद्दल राग, द्वेष नसानसात मिसळायला हवा होता. औरंगजेबाच्या विरोधात जी आग पेटायला हवी होती ती विझली. आग कोणामध्ये पेटली ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये, म्हणजेच हिंदू-हिंदूमध्ये आग पेटली. हाच हिंदू जातीला लागलेला शाप आहे. आपण कधी विचार करणार आहोत, कधी?,” असा शरद पोंक्षे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्यांचं ‘पुरुष’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. राजन ताम्हणे दिग्दर्शित ‘पुरुष’ नाटकात शरद पोंक्षेंसह स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसंच लवकरच शरद पोंक्षे यांचा ‘बंजारा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट शरद यांचा मुलगा स्नेह पोंक्षेने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शरद यांच्यासह भरत जाधव आणि सुनील बर्वे पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader