प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. काही वर्षांपूर्वी शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर उपचार सुरू असल्याने मधली काही वर्ष ते मनोरंजनविश्वापासून दूर होते.
अखेर कर्करोगावर मात करत त्यांनी २०१९ मध्ये ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा एन्ट्री घेतली. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नाटक, चित्रपट तसेच मालिका यांच्या चित्रीकरणात शरद पोंक्षे सध्या व्यस्त आहेत. शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ठीकठिकाणी ते व्याख्यानंही देत असतात.
आणखी वाचा : “जागे व्हा, आपल्या ह्या हिंदू धर्माला…” शरद पोंक्षे यांची ‘द केरला स्टोरी’बद्दल मोठी प्रतिक्रिया
कर्करोगाशी झुंज देताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी नुकतेच एका पुस्तकाच्या माध्यमातून लोकांबरोबर शेअर केले. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे ज्यात त्यांनी कर्करोग झाल्याचं समजल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया यावर भाष्य केलं आहे. व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “ज्यादिवशी मला कॅन्सरगाबद्दल समजलं ती रात्र माझ्यासाठी कठीण होती. काही कळत नव्हतं काय करावं? पण रात्रभर मी विचार केला की आता जे झालंय त्यात काहीच बदल होणार नाही. कुणीतरी माझ्यावर हात ठेवला अन् माझा कॅन्सर बरा झाला असा काही चमत्कार घडणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “जे आहे ते स्वीकारायला हवं, आणि मी जेवढ्या लवकर ही गोष्ट स्वीकारेन तेवढे मला त्यातून बाहेर पडायचे मार्ग दिसायला लागतील. त्यावेळी मी तो कॅन्सर स्वीकारायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे उठलो, फ्रेश होतो आणि डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्यांना भेटायचं ठरवलं आणि पुढे उपचार कसे करायचे, कुठल्या रुग्णालयात भरती व्हायचं हे सगळं ठरवलं.”