Sharda Sinha Passes Away : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं आज निधन झालं आहे. त्यांनी आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर एम्स रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान शारदा सिन्हा यांचं मंगळवारी रात्री (५ नोव्हेंबर) निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शारदा सिन्हा यांचा फोटो शेअर करत मुलगा अंशुमन सिन्हाने हिंदीत लिहिलं की, “तुमच्या प्रार्थना आणि प्रेम माझ्या आईसोबत कायम राहतील. इश्वराने आईला स्वतःकडे बोलावलं आहे. आता ती आपल्यासोबत राहिली नाही”, असं अंशुमन सिन्हाने म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

शारदा सिन्हा यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारदा सिन्हा यांच्या मुलाशी फोनवर चर्चा करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. मात्र, आज शारदा सिन्हा यांचं निधन झालं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला

प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर (ट्विटर) शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हाजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांची भोजपुरी लोकगीते अनेक दशकांपासून प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharda sinha death famous singer sharda sinha passed away aiims hospital in delhi gkt