‘शार्क टँक इंडिया’मुळे सर्वांनाच परिचित असलेलं नाव म्हणजे उद्योजिका विनीता सिंह. विनीता सिंह ही ‘शुगर’ या सौंदर्यप्रसाधन कंपनीची संस्थापक आहे. तिच्या ‘शुगर’ या सौंदर्यप्रसाधन कंपनीची जगभरात चर्चा आहे. विनीता सिंह तिच्या ‘शुगर’ सौंदर्यप्रसाधन कंपनीच्या जोरावर आज करोडोंचा डोलारा सांभाळत आहे. पण विनीताच्या या व्यवसायात तिला चक्क मुंबईतील एका फळविक्रेत्याची मदत झाली आहे आणि याबद्दल स्वत: विनीतानेच माहिती दिली आहे. विनीताने आपल्या सोशल मीडियावर याबद्दलची खास पोस्ट शेअर केली आहे. विनीताने तिच्या मुंबईच्या कुलाबामधील ‘शुगर’च्या स्टोअरसमोरील फळविक्रेत्याबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे आणि या पोस्टखाली तिने या फळविक्रेत्याची तिला व्यवसायात नेमकी कशी मदत झाली? याबद्दलची पोस्ट लिहिली आहे.

विनीता सिंहने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “आमच्या कुलाबा कॉजवेवरील ‘शुगर’च्या दुकानाच्या भाडेतत्त्वावर स्वाक्षरी करण्यापूर्वी आम्हाला मुख्य रस्त्यावरून दिसणारे स्टॉल्स अडथळा आणतील अशी भीती होती. पण, कुलाबा म्हणजे कुलाबा आहे. इथल्या प्रत्येक दुकानासमोर एक स्टॉल आहे आणि दुकानांपेक्षा या स्टॉल्सचा मोठा वारसा आहे, म्हणून आम्ही हा प्रयोग करून पाहण्याचा निर्णय घेतला आणि याचा फायदा म्हणजे गेल्या १२ महिन्यांत आम्हाला या स्टोअरमधील उत्पादनांची विक्री वाढताना दिसू लागली. त्यामुळे एक लाखांहून अधिक उत्पादनांच्या बिलांचा मागोवा घेत मी तिथे नेमकं काय चाललं आहे ते शोधण्यासाठी गेले. तिकडे जाताच असे दिसून आले की, पर्यटनासाठी मुंबईत येणाऱ्या अरब महिला या सर्वात वेगाने वाढणारा ग्राहकांचा समूह आहेत.”

यापुढे विनीताने म्हटलं, “या अरबी महिलांना भारतीय मेकअप आवडतो; कारण त्यांच्याकडेही आपल्यासारखेच उबदार रंग आहेत आणि त्यांना तिथल्या उष्ण हवामानाला अनुकूल अशी उत्पादनं हवी असतात. पण, ते आम्हाला कसे शोधणार? बरं, सूरज व त्याचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या दुकानासमोर फळांचा स्टॉल चालवत आहेत आणि अनेक अरबी महिला त्यांच्याकडे फळे खरेदी करण्यासाठी येतात. तेव्हा सूरज त्यांना अरबीमध्ये ‘कहाल’बद्दल म्हणजेच “भारतीय काजळ हवे आहेत का?” असं विचारतो. यावर त्या महिला भारतीय मेकअप वापरून पाहण्यासाठी ‘शुगर’ स्टोअरमध्ये येतात आणि शेवटी त्यांना आवडणाऱ्या १५-२० सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांची खरेदी करून जातात.”

यापुढे विनीताने पोस्टमध्ये असं म्हटलं, “जेव्हा सूरजकडे (फळविक्रेता) ग्राहक नसतात, तेव्हा मेघा (शुगर स्टोरमधील महिला) सूरज आणि त्याच्या वडिलांना एसीमध्ये चहासाठी बोलावते आणि तेव्हा सूरज तिला अरबी भाषादेखील शिकवतो. म्हणून जेव्हा मेघाकडे परदेशी ग्राहक येतात, तेव्हा ती त्यांना बाहेर जाण्यापूर्वी तिच्या तुटक्या अरबी भाषेत काही भारतीय फळे खरेदी करण्याची आठवण करून देते.” यापुढे विनीताने व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील अशा छोट्या पण तरीही महत्त्वाच्या घटकांचे कौतुक करत म्हटलं की, “भारत खरोखरच उद्योजकांचा देश आहे. आपल्याकडे प्रक्रिया आणि प्रणाली असणे आवश्यक आहे. माझ्या व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील मर्यादित व किरकोळ अनुभवानुसार व्यवसायात सर्वात मोठा फरक करणारे हे लोक आहेत आणि कधीकधी हे असे लोक या प्रणालीशी संबंधितही नसतात.”

Story img Loader