भारताची ‘स्टार’ बॅडमिटंनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खान यांच्यात नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन सामन्यात सायनाला शाहरुखकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात शाहरुखने सायनाला हरविले. बॅडिमटन कोर्टवर भल्याभल्यांना चीत करणाऱ्या सायनाने शाहरुखपुढे मात्र आनंदाने हार मानली. शाहरुखने ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साइटवर याबाबत ट्वीट करून माहिती दिली आणि सायनाबरोबरचे छायाचित्रही अपलोड केले आहे.
सायना नेहवालने नुकतीच शाहरुखची भेट घेतली होती. त्या वेळी या दोघांमध्ये बॅडमिंटनचा सामना रंगला. रंगलेल्या या सामन्यात सायनाने आपला लाडका अभिनेता असलेल्या शाहरुखपुढे हार पत्करली. सध्या शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणाच्या वेळी सायना शाहरुखला भेटण्यासठी सेटवर गेली होती. तेव्हा सायना आणि शाहरुख यांच्यात बॅडमिंटनचा सामना रंगला.
सायना ही शाहरुखची ‘फॅन’ आहे. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या सेटवर सायनाने शाहरुख आपला आवडता हिरो असल्याचे आणि आपण त्याची फॅन असल्याचे सांगितले होते. शाहरुखच्या या भेटीबाबत सायना नेहवालनेही ‘ट्वीट’ केले आहे. शाहरुख सर यू आर सच अ नाइस पर्सन, असे ट्वीट करून सायनाने तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. तुमचे आभार’ असेही पुढे म्हटले आहे.