प्रतिनिधी

आमचा गणपती ठाण्यात काकांच्या घरी येतो. दीडच दिवसांचा गणपती असतो, पण त्यानिमित्ताने कुटुंबीय एकत्र येतात. गप्पाष्टकं रंगतात. पक्वान्नांची रेलचेल असते. आमच्या घरी हा उत्सव मोठय़ा उत्साहात तरीही शांततेत साजरा होतो.

गणेशोत्सव आणि त्या काळात होणारं जल-वायू-ध्वनिप्रदूषण हा दर वर्षीच चर्चेचा मुद्दा ठरतो. पण हा प्रश्न आम्ही आमच्यापुरता मिटवला आहे. मूर्ती फार मोठी नसते आणि सजावटही पर्यावरणस्नेही असते. पानाफुलांची, कागदाची, पुठ्ठय़ाची सजावट केली जाते. आमची वहिनी फार हौशी आहे. तिच्याकडे कलात्मक दृष्टी आहे. ती टाकाऊतून टिकाऊ स्वरूपाची अतिशय देखणी आरास करते. शूटिंगच्या व्यापामुळे मी या तयारीत फारसा सहभाग घेऊ शकत नाही.

सगळे तालासुरात आरती करतात. रात्री जागरणाच्या वेळी सगळी भावंडे मिळून खूप धिंगाणा घालतात. ठाण्यात उपवनमध्ये कृत्रिम तलाव तयार केला जातो. त्यात मूर्ती विसर्जित केली जाते. मी टीव्ही मालिकांमध्ये काम करू लागल्यापासून मला अनेक लोक ओळखू लागले आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी गेल्यानंतर सर्वाच्या नजरा कुतूलहाने वळलेल्या दिसतात. एका वर्षी लोक खूपच गर्दी करू लागले. त्यामुळे मला गाडीत बसून परत यावं लागलं. त्यामुळे यापुढे मला कोणीही ओळखू शकणार नाही, याची काळजी घेऊनच मिरवणुकीत सहभागी व्हायचं असं ठरवलं आहे. दर वर्षी गणपतीच्या विसर्जनानंतर मिसळ-पावचा बेत ठरलेला असतो. पुण्यात आमचं हॉटेल आहे. काही वेळा तिथलं सगळं साहित्य आणून मिसळ केली जाते. तर कधी ठाण्यातल्या काही हॉटेलांमधली मिसळ आणली जाते.

गणेशोत्सवाचं आता व्यापारीकरण झालं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात मी फार कधी सहभाग घेतला नाही. परिसरातील मंडळांत वाद-विवाद असतील, त्यांच्यात स्पर्धा असेल, तर सणाचं पावित्र्य राखलं जात नाही. सणाच्या नावाखाली रात्रभर जो धांगडधिंगा घातला जातो, तो अयोग्य वाटतो. आप्त-मित्रांच्या सहवासात आणि आपल्या आनंदाचा इतरांना कोणताही उपद्रव होणार नाही, याची काळजी घेऊन साजरा केला जाणारा गणेशोत्सव मला भावतो.

सौजन्य – लोकप्रभा