काही कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असतात. आपल्या वाटय़ाला आलेली व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनतीने साकारण्यात माहीर असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत अभिनेते शशांक शेंडे. शशांक यांनी नेहमीच वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ‘पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटात स्मशानजोग्याच्या भूमिकेत असणारे शशांक शेंडे एका वेगळय़ाच लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘पल्याड’ या चित्रपटात स्मशानजोगी समाजातल्या एका परिवाराची गोष्ट रंगवण्यात आली आहे. त्यामुळे शशांक यांचा लुक काहीसा फकिरासारखा आहे. वाढलेली दाढी-मिशी, भगवं वस्त्र, डोक्यावर फेटा, खांद्यावर उपरणं, कपाळासोबतच दोन्ही डोळय़ांच्या खालच्या बाजूस लावलेला अष्टगंध, गळय़ात विविध प्रकारच्या माळा, शंख, तावीज, हातामध्ये घुंगरू लावलेली काठी आणि घंटी असा आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळय़ा अशा लुकमध्ये ते पाहायला मिळणार आहेत. निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी ‘पल्याड’ची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन शैलेश भीमराव दुपारे यांचं आहे.

‘या भूमिकेसाठी एका वेगळय़ाच ऊर्जेची गरज होती. लुकच्या जोडीने बोलीभाषा, देहबोली आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर ही व्यक्तिरेखा साकारली आहे,’ अशी माहिती शशांक शेंडे यांनी दिली. शशांक यांच्याबरोबर चित्रपटात देविका दफ्तरदार, रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, गजेश कांबळे, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उईके, रवी धकाते, सुमेधा श्रीरामे, चैताली बोरकुटे, अश्विनी खोब्रागडे आणि सचिन गिरी यांच्या भूमिका आहेत. ‘पल्याड’ची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी केलं आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.