अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी अडचणीत सापडला होता. आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात देखील होता. मात्र काही दिवसांपूर्वीच आर्यनला क्लीनचीट देण्यात आली. या सगळ्या प्रकरणामध्ये अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आर्यनला पाठिंबा दिला. मात्र शाहरुखने साधे आपले आभार देखील मानले नसल्याचं शत्रुघ्न यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – कमल हासन यांच्या ‘विक्रम’पुढे अक्षय कुमारने टेकले हात, ४ दिवसांमध्येच ‘सम्राट पृथ्वीराज’कडे प्रेक्षकांची पाठ

नेशन नेक्स्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न यांनी शाहरुखवर असलेली नाराजी व्यक्त केली आहे. या मुलाखतीदरम्याने त्यांनी सांगितलं की, “एक पालक म्हणून शाहरुखचं दुःख काय असेल हे मी त्यावेळी समजू शकलो. आर्यनला तुरुंगात पाठवण्यात आलं. पण आर्यनच्या बाजूने बोलण्यासाठी मी सगळ्यात पुढे होतो. मी नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहतो आणि ही माझी सवय आहे. त्यावेळी मला वाटलं अन्याय होत आहे म्हणून मी बोललो. पण शाहरुखने साधे माझे आभार देखील मानले नाहीत. किंवा थँक्यु कार्डसुद्धा मला पाठवलं नाही.”

तुम्ही शाहरुखशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न शत्रुघ्न यांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, “अजिबात नाही. मी का करु? मला तर त्याच्याकडून काम देखील नको आहे. त्याच्याशी संवाद साधण्याची मला गरज वाटत नाही.” यावरुनच शत्रुघ्न शाहरुखवर किती नाराज आहेत हे स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा – ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा बंद होणार, पण यामागचं नेमकं कारण काय?

शाहरुखने आपल्याकडून कोणत्याच प्रकारचा पाठिंबा मागितला नसल्याचं देखील शत्रुघ्न यांनी स्पष्ट केलं होतं. पण आर्यनला पाठिंबा दिल्याबाबत शाहरुखकडून एक फोन किंवा आभार पत्राची शत्रुघ्न यांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. पण आर्यनला क्लीनचीट देण्यात आल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा खूश झाले.

Story img Loader