मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्याचं अकस्मात निधन इंडस्ट्रीतील कलाकारांसह त्याच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेलं. त्याच्या निधनाला वर्ष होत आलं असलं तरी त्याच्या चाहत्यांच्या आणि जवळच्या लोकांच्या मनात त्याच्या आठवणी अजूनही कायम आहे. त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक असलेल्या शहनाजसाठी त्याच्या अचानक निघून जाण्याचं दुःख सहन करणं खूप कठीण होतं.
सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या अफेअरच्या चर्चाही खूप झाल्या. पण दोघांनी त्यांच्या नात्याला कोणतंच नाव दिलं नव्हतं. अनेक ठिकाणी ते एकमेकांसमवेत दिसायचे. आता सिद्धार्थला जाऊन वर्ष होत असलं तरी शहनाज कधीच रडताना किंवा त्याच्याबद्दल बोलताना दिसली नाही. त्याच्या निधनानंतर ती एकटी पडली होती. मित्र आणि काम या गोष्टींपासूनही ती दुरावली. मात्र घरच्यांनी हिंमत दिल्याने आणि सिद्धार्थची आई रीटा शुक्ला यांच्यामुळे शहनाजच्या हळूहळू सामान्य झाली. पण यावरूनही तिला ट्रोल केलं गेलं. आता शहनाजने सिद्धार्थचं निधन आणि ट्रोलिंग याबाबत भाष्य केलंय.
हेही वाचा –“…तोपर्यंत मलायकाशी लग्न करणार नाही”; अर्जुन कपूरचा खुलासा
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शहनाज म्हणाली, “त्यावेळी मी खूप दुःख सहन करत होते, पण मी जाणीवपूर्वक माझ्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या नाहीत. कारण जर तुम्ही जगासमोर रडू लागले की लोक म्हणतील की मी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेय. लोक तुम्हाला कमजोर समजतात आणि मी कमजोर नाही. शिवाय मी कधीच माझ्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला नाही. पण, मी एकटीने या दुःखाचा सामना केलाय आणि आता मी ठिक आहे.”
काही जणांनी शहनाजवर सिद्धार्थचा मृत्यू लवकर विसरल्याची टीका केली होती. त्यांना उत्तर देताना शहनाज म्हणाली, “लोकांना पूर्ण गोष्ट माहितच नाही, मग ते याबद्दल काहीही कसे बोलू शकतात? असं झालं की मला माझं काम पुन्हा सुरू करायचं होतं, परत यायचं होतं, मग तुम्ही एखाद्याचा खूप आदर करता, पण तुम्ही त्याच्यासाठी काहीच केलं नाही तर पुढे कसं जाणार? हे गाणं सिद्धार्थच्या सन्मानासाठी होतं आणि ज्यांना त्याबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी होतं. जे लोक बोलताहेत त्यांना याबद्दल काहीच माहित नाही, मग ते काही बोलले तर आपण दुःखी का व्हायचं. त्यांच्याजवळ जे ज्ञान असेल ते त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावं,” असं शहनाज म्हणाली.
हेही वाचा –रिअॅलिटी शोमध्ये रडण्यावरून ट्रोल होणारी नेहा कक्कर म्हणाली, “शो मजेदार बनवण्यासाठी…”
दरम्यान, शहनाजच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सलमान खानच्या ‘कभी ईद, कभी दिवाली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.