मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरापासून दूर अंतरावर ‘कसम भवानी की’ हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते. अभिनेत्री योगिता बाली, नाझनीनसह अन्य एका अभिनेत्री-नृत्यांगनेचा त्यात सहभाग होता. ‘त्या’ अभिनेत्रीवर एक गाणेही तिथे चित्रित होणार होते. चित्रीकरणस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त का?, अशी विचारणा केली असता तेथील  कुख्यात डाकू ‘त्या’ अभिनेत्री-नृत्यांगनेचा चाहता असून तो तिला पळवून नेण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अखेर निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी तेथील चित्रीकरण रद्द करून मुंबईत गोरेगाव येथे सेट उभारला आणि त्या चित्रपटातील ‘मेरी लाल गुलाबी चोली’ या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. तो कुख्यात डाकू ज्या अभिनेत्री-नृत्यांगनेचा चाहता होता त्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना जयश्री टी, आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी, हिंदीसह विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधून नायिका, सहनायिका, खलनायिका आणि नृत्यांगना म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या जयश्री टी यांचे आडनाव तळपदे. ‘बालक’ या हिंदी चित्रपटाच्या वेळी सोहनलाल मास्टरजी यांनी त्यांचे नामकरण ‘टी. जयश्री’ असे केले. पण हे नाव दाक्षिणात्य अभिनेत्रीचे वाटेल म्हणून जयश्री यांना ते नाव फारसे रुचले नाही. त्यांनी ‘जयश्री टी’ असे नाव घेऊ  का? अशी विचारणा सोहनलाल यांना केली आणि चित्रपटासाठी त्या ‘जयश्री टी’ झाल्या आणि पुढे हेच नाव त्यांची ओळख बनली.

तळपदे कुटुंबीय मुंबईचेच. गिरगावातील ठाकूरद्वार येथे सुरुवातीची काही वर्षे त्यांचे वास्तव्य होते. पुढे ते सांताक्रूझ येथे स्थायिक झाले. वडील चित्रसेन, आई सुगंधा आणि तीन बहिणी, एक भाऊ  असे त्यांचे कुटुंब. त्यांची मोठी बहीण मीना टी याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. खालसा महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या त्या विद्यार्थिनी. महाविद्यालयाच्या एका वार्षिक स्नेहसंमेलनात एक नृत्य सुरू होते. जयश्री प्रेक्षकांत बसल्या होत्या. ते नृत्य पाहून याला काय नाच म्हणायचा? अशी टिप्पणी जयश्री यांनी केली. त्यावर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी तुला नृत्य करता येते का? असा प्रश्न के ला. त्यावर हो.. असे सांगून नृत्य केले तर मी एकटी करेन, असे उत्तर त्यांनी दिले. जयश्री यांनी नृत्य सादर केले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना पसंतीची पावती मिळाली. पुढे अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धामधून त्यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आणि पारितोषिके मिळवून दिली.  पुढे ‘जयश्री टी’ असे नाव आणि प्रसिद्धी झाल्यानंतर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती.

सुरुवातीच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, ‘‘माझे वडील चित्रसेन तेव्हा मराठी आणि गुजराथी नाटकात काम करत होते. आईलाही गाण्याची आणि नृत्याची आवड होती. माझे मामा खंडेराव देसाई याच क्षेत्रातले. एकदा घरी असताना ‘राधा ना बोले, ना बोले ना बोले रे’ या गाण्यावर नाच करताना आईने पाहिले. आईने तो नाच मला शिकवलाच पण माझी नाचाची आवड लक्षात घेऊन केसरी पांचाळ यांची शिकवणी मला लावली. ते माझे पहिले गुरू. ते घरी येऊ न शिकवत असत. त्यांच्याकडे मी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. पुढे काही वर्षांनी नृत्यगुरू गोपीकृष्ण यांच्याकडूनही नृत्याचे धडे गिरवले. शालेय वयात माझे नृत्याचे कार्यक्रम सुरू झाले होते. एक दिवस आमच्या घरी ‘रामदास’ नावाची व्यक्ती आली आणि त्यांनी वडिलांना ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटासाठी विजय भट्ट हे एका भूमिकेसाठी लहान मुलीच्या शोधात असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितल्यानुसार मी आणि आई प्रकाश स्टुडिओत जाऊन भट्ट यांना भेटलो आणि त्यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी माझी निवड केली. त्या वेळी मी अवघी पाच वर्षांची होते. चित्रपटात अभिनेत्री अनिता गुहा यांच्या लहानपणीची भूमिका मला करायची होती. अशा प्रकारे माझा हिंदी चित्रपटात प्रवेश झाला. खरी गंमत नंतरच आहे. पुढे आमच्याकडे जे ‘रामदास’ आले होते त्यांचा शोध घेण्याचा वडिलांनी प्रयत्न केला पण अशी कोणीही व्यक्ती आढळून आली नाही. माझे आई आणि वडील दोघेही रामाचे आणि शिर्डीच्या साईबाबांचे भक्त. त्यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा. राम आणि साईबाबांच्या रूपाने ‘रामदास’ आले असे आई-वडिलांना वाटले.’’

‘संगीतसम्राट तानसेन’, ‘जमीन के तारे’, ‘प्यार की प्यास’ आदी चित्रपटांत त्यांनी बाल कलाकार म्हणूनही काम केले. पुढे ‘अभिलाषा’ या हिंदी चित्रपटात नृत्य करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यासाठी हिंदी रुपेरी पडद्याचे मोठे दालन खुले झाले. आजवरच्या कारकीर्दीत जयश्री यांनी पाचशेहून अधिक हिंदी चित्रपटांत अभिनय आणि नृत्य केले आहे. ‘धर्मकन्या’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटातील ‘सखी गं मुरली मोहन’ आणि ‘नंदलाला रे’ ही गाणी जयश्री यांच्यावरच चित्रित झाली होती. मराठीत त्यांनी दादा कोंडके यांच्याबरोबर ‘ह्य़ोच नवरा पाहिजे’ तर हिंदीत ‘तेरे मेरे बीच में’ या चित्रपटात नायिका म्हणून काम केले. ‘चटक चांदणी’, ‘तूच माझी राणी’ (या चित्रपटात अमोल पालेकर त्यांचे नायक होते), ‘बायानो नवरे सांभाळा’ आणि अन्यही काही मराठी चित्रपट त्यांनी काम केले. मराठी, हिंदीसह जयश्री यांनी बंगाली, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मारवाडी, राजस्थानी, गुजराथी, सिंधी, आसामी, भोजपुरी, ओडिसा, पंजाबी आणि एका इंग्रजी अशा तब्बल १८ भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘राझ’, ‘चंदा और बिजली’, ‘जानी दुश्मन’, ‘शौकीन’, ‘अंदर बाहर’, ‘घर घर की कहॉंनी’, ‘घर हो तो ऐसा’, ‘चलते चलते’, ‘मेरी बिबी का जबाब नही’, ‘खिलौना’, ‘सावन भादो’, ‘शर्मिली’ हे त्यांचे गाजलेले काही हिंदी चित्रपट. तर ‘इस प्यार को क्या नाम दू’ आणि ‘दो दिल एक जान’ या त्यांच्या गाजलेल्या हिंदी मालिका.

अभिनय आणि नृत्याबरोबरच जयश्री यांच्या कारकिर्दीत विविध ‘स्टेज शो’ हाही महत्त्वाचा टप्पा आहे. त्याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याबरोबर पहिला ‘स्टेज शो’ केला. पुढे मुकेश, मोहम्मद रफी, किशोरकुमार, तलत मेहमूद, मन्ना डे, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, भप्पी लाहिरी, आशा भोसले यांच्याबरोबर देशात आणि परदेशात स्टेज शो केले. यात माझा सहभाग गाण्यांवरील नृत्यासाठी असायचा. लता मंगेशकर यांचा अपवाद वगळता हिंदीतील सर्व गायक-संगीतकारांबरोबर ‘स्टेज शो’ केले आहेत. त्याशिवाय, माझे स्वत:चे नृत्याचे ‘स्टेज शो’ही केले. त्यालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

हिंदीतील अनेक चित्रपटांत अभिनयही केला असला तरी बहुतांश चित्रपटात ‘नृत्यांगना’ म्हणूनच प्रेक्षकांसमोर आले. गुरुदत्त, संजीवकुमार यांच्या ‘चंदा और बिजली’ या चित्रपटातील कॅब्रे नृत्यानंतर पुढे अनेक चित्रपटांतून तशाच प्रकारचे नृत्य सादर केले पण असे असले तरी केवळ कॅ ब्रे हाच नृत्यप्रकार पडद्यावर सादर केला असे नाही तर लोकनृत्य, मुजरा, भांगडा, गरबा आणि पाश्चात्त्य शैलीतील अन्य नृत्यप्रकार चित्रपटांत सादर करण्याची संधी मला मिळाली. गुजराथी, पंजाबी, भोजपुरी (‘बिटियाँ चले ससुराल’, ‘हमार भौजी’) आदी चित्रपटांत आघाडीची नायिका म्हणून काम केल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हिंदी चित्रपटांतील तेव्हाच्या आणि आत्ताच्या नृत्यशैलीबाबत जयश्री यांना विचारले असता त्यांनी सांगितले, काळानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात तसे ते चित्रपटातील नृत्यशैली आणि सादरीकरणातही झाले आहेत. हे बदल स्वीकारले पाहिजेत. तेव्हाचे सर्व चांगले आणि आत्ताच्या काळातील वाईट असे मी म्हणणार नाही. नृत्य सादरीकरण, त्याचे चित्रीकरण याची तंत्रशैली आता खूप बदलली आहे. आत्ताच्या काळातील ‘आयटम सॉंग’ प्रकार पूर्वी नव्हता. तेव्हा हिंदी चित्रपटातील व्हॅम्प (खलनायिका) कॅ ब्रे आणि तत्सम प्रकारची नृत्ये अधिक करत होत्या. नायिका तशा प्रकारचे नृत्य करत नव्हत्या. आता सर्व बदलले असून नायिकाही तशा प्रकारचे नृत्य करताना पहायला मिळतात. आम्ही कॅ ब्रे किंवा त्या प्रकारचे नृत्य चित्रपटात केले पण त्यात बीभत्सपणा नव्हता. स्वत:वर एक मर्यादा घालून आणि स्वत:चा आब राखून आम्ही नृत्य केले. ‘जब बागों में जुगनू चमके आधी रात में’, ‘नाच मेरी जान फटाफट’ (मै सुंदर हू), ‘रेशमी उजाला है’ (शर्मिली), ‘सुलताना सुलताना’ (तराना) ही आणि अन्य माझ्यावर चित्रित झालेली काही गाणी लोकप्रिय ठरली.

राज कपूर  यांच्या ‘आरके’ स्टुडिओतील धुळवड बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होती. या धुळवडीच्या कार्यक्रमाला सीतारादेवी, गोपीकृष्ण यांच्यासारख्या दिग्गजांसोबत नृत्य करण्यासाठी राज कपूरसाहेब मला बोलवायचे. ‘आवो बिजली’ अशी हाक मारून ते माझ्याशी बोलत असल्याची आठवणही त्यांनी गप्पांच्या ओघात सांगितली. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणींना काय सांगाल? यावर त्या म्हणाल्या, या क्षेत्रातली सर्वच माणसे वाईट नाहीत. अनेक चांगली माणसेही येथे आहेत. तुम्ही कोणाच्याच हातात बोटही देऊ  नका मग कोणी हात हातात घेण्याचा प्रश्नच येणार नाही. मर्यादा आणि भान ठेवून काम करा. तुमच्या कामावर, नृत्यकलेवर विश्वास ठेवा. कष्ट करण्यास आणि नवीन काही शिकण्यास कधीही नाही म्हणू नका. कठोर मेहनत आणि देवाचा आशीर्वाद यामुळे तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल याची मनाशी खात्री बाळगा. जयश्री यांचीही साईबाबा आणि रामावर श्रद्धा आहे.

हिंदी रुपेरी पडद्यावरील मी आणि वास्तव जीवनातील मी यात खूप फरक आहे. पडद्यावर ज्या भूमिका रंगवल्या किंवा ज्या प्रकारचे नृत्य सादर केले तशी वास्तवात अजिबात नाही, असेही त्या सांगतात. अभिनेत्री नंदा यांचे बंधू आणि निर्माते-दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी हे त्यांचे पती. त्यांचा स्वस्तिक हा मुलगा याच क्षेत्रात आहे. मात्र त्याला अभिनयाची नव्हे तर दिग्दर्शनाची विशेष आवड आहे. ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘पोस्टर बॉईज’ या हिंदी चित्रपटांसाठी त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

आजवरच्या कारकीर्दीत दिलीपकुमार ते सलमान खान यांच्याबरोबर काम करायला मिळाले. नायिका, सहनायिका, खलनायिका, चरित्रात्मक अशा विविध भूमिका केल्या. मेहमूद, जगदीप, जॉनी वॉकर आणि मी आमची जोडी बऱ्याच चित्रपटांत होती. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काही चित्रपटांतून काम केले. ‘जयश्री टी’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे हीच माझ्या कामाची पावती आहे असे मनापासून वाटते. खरे तर मला डॉक्टर व्हायचे होते आणि नियतीने वेगळे काही ठरविले. पण आजवर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केले. या सर्व प्रवासात आई-वडील आणि देवाचा आशीर्वाद माझ्या कायम पाठीशी होता आणि आहे. आजवर जे काही मिळाले त्यात समाधानी आणि आनंदी असल्याचे सांगत जयश्री यांनी या गप्पांचा समारोप केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shekhar joshi chat with film actress jayshree t