अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वादानंतर सुरु झालेल्या #MeToo या मोहिमेचा जोर काही अंशी ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींचीही नावं समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाने चांगलाच जोर धरला होता. मात्र एका ठराविक काळानंतर महिलांचा लढा कमी झाला. यावर अभिनेता शेखर सुमन यांनी ‘हा लढा मागे का पडला आहे’, असं विचारत पहिल्यांदाच #MeToo वर भाष्य केलं आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, #MeToo च्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या शारीरिक, मानसिक छळावर भाष्य केलं होतं. यामध्ये शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमननेदेखील त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. अभिनेत्री कंगनासोबत रिलेशनशीपमध्ये असताना तिने अनेक वेळा मारहाण केल्याचं अध्ययनने ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं होतं. परंतु अध्ययनच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करत तो प्रसिद्धीसाठी सारं काही करत असल्याचं म्हटलं होतं. यावर आता शेखर सुमन यांनी आपल्या मुलाची बाजू घेत ‘महिलांचं हे चार दिवसांचं आंदोलन आता थांबलं का’? असा प्रश्न विचारला आहे.

‘स्त्री असो वा पुरुष कोणतीही व्यक्ती त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला #MeToo मोहिमेअंतर्गत वाचा फोडू शकते. त्याप्रमाणेच अध्ययननेही त्याची ‘मी टू’ स्टोरी शेअर केली होती. परंतु अध्ययन पब्लिसिटीसाठी हे करत असल्याची टीका त्याच्यावर झाली होती. पण मला एक प्रश्न पडला आहे. आता महिलादेखील #MeToo च्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं कथन करत आहेत. मग त्यादेखील पब्लिसिटीसाठी हे आरोप-प्रत्यारोप करत आहेत का ?’, असा प्रश्न शेखर सुमन यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

पुढे ते असंही म्हणाले, ‘आता याप्रकरणी साऱ्या महिलांनी माघार घेतल्याचं दिसून येत आहे. ‘चार दिन की चांदनी’प्रमाणे साऱ्यांनी #MeToo च्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर आता साऱ्या महिला शांत झाल्या आहेत. मग आता हे आंदोलन बंद झालं?, अन्यायाला वाचा फोडणारा त्यांचा लढा संपला का ?’

दरम्यान, काही दिवसापूर्वी अध्ययनने ट्विटरच्या माध्यमातून #MeToo मोहीमेचा आधार घेत दोन वर्षापूर्वीच त्याच्यावर झालेल्या अत्याचारांचं कथन केलं होतं. अनेकांनी मला फ्लॉप ठरवून सतत माझा पाणउतारा केला होता, असं म्हटलं होतं.

Story img Loader