‘लाइट, कॅमेरा, अ‍ॅक्शन’ हे चित्रपट जगतातील परवलीचे शब्द. हे शब्द जोपर्यंत दिग्दर्शकाच्या तोंडून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत कॅमेऱ्यातील रिळे सुरू होत नाहीत आणि त्या कॅमेऱ्यासमोर उभ्या असणाऱ्या कलाकारांचे विश्वही या तीन शब्दांवर अडकलेले असते. या तीन शब्दांनंतर कॅमेऱ्यासमोर सुरू झालेली गोष्ट, ‘कट’ म्हटल्यानंतर सुरू झालेल्या कॅ मेऱ्याबाहेरच्या गोष्टी अशा अनेक किश्श्यांमधून एक हिंदी चित्रपट घडत असतो, कधी बिघडत असतो. प्रत्येक चित्रपटाचे, कलाकारांचे असे किस्से सांगण्याचे काम अभिनेता शेखर सुमन करणार आहे.
‘सोनी मॅक्स २’ या वाहिनीवर अभिनेता शेखर सुमन एका वेगळ्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहे. राजकीय व्यक्ती आणि परिस्थितीवर हलकीफुलकी टिप्पणी करणाऱ्या शेखर सुमनला आपण कित्येक वेळा पाहिले आहे. मात्र तो स्वत: ज्या चित्रपटसृष्टीचा सदस्य म्हणून कार्यरत होता त्यातले किस्से त्याच्या तोंडून ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘लाइट, कॅ मेरा, किस्से’ असे त्याच्या शोचे नाव असून अवघ्या तीन मिनिटांचा हा कार्यक्रम असणार आहे. पण, हा तीन मिनिटांचा कार्यक्रम दिवसभरात सहा वेळा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्मितीमागच्या सुरस कथा, प्रसिद्ध कलाकारांबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी, त्यांची कित्येक गुपिते या कार्यक्रमातून किश्शांच्या माध्यमातून शेखर सुमन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे.
‘एखाद्या चित्रपटाबद्दल माहिती नसलेली गोष्ट जेव्हा आपल्याला कळते तेव्हा तो चित्रपट आपल्याला अधिक जवळचा वाटायला लागतो. पडद्यामागच्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तो चित्रपट पाहण्यातला आनंद अधिक वाढतो. चित्रपटाबरोबर आपले अत्यंत वेगळे भावनिक बंध जोडले जातात’, असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी भावबंध निर्माण करणाऱ्या शेखर सुमन यांनी सांगितले.

Story img Loader