रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती नाही, अशी व्यक्ती सापडणं विरळा. या जाणत्या राजाच्या पराक्रमाच्या गोष्टी आजवर एका पिढीने वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत, अभ्यासल्या आहेत, क्वचित सत्तर एमएमच्या पडद्यावरूनही अनुभवल्या आहेत. त्याच पिढीकडून हा शिवकालीन इतिहास आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो आहे. हा इतिहास ज्वलंत आहे. त्यात पराक्रम आहे, जिजाऊंचे संस्कार आहेत, राजांची शिस्त आहे, युद्धाचं तंत्र आहे, मावळय़ांची निष्ठा आहे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा खमकेपणा आहे.. मानवी भावभावना, गुण-अवगुण, सुख-दु:खाच्या अनेक क्षणांचा संकर असलेला हा इतिहास नव्या-जुन्या दोन्ही पिढय़ांना आपलासा वाटेल अशा पद्धतीने मांडण्याचं तंत्र दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना जमलं आहे. ‘शेर शिवराज’ने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे.

‘जाणता राजा’ एका रात्रीत घडत नाही. संस्काराचं शिंपण, जिद्दीचं बळ देऊन तो घडवावा लागतो. स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतलेल्या जिजाऊंनी रयतेला परकीय आक्रमणातून मुक्त करायचं असेल तर त्यासाठी नरसिंहाचं बळ अंगी आणावं लागतं, ही गोष्ट लहानपणापासून शिवबांच्या मनात रुजवली होती. आईच्या संस्कारांचं बळ आणि तिच्या आज्ञेत राहून शिवाजी महाराज स्वराज्याचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी अहर्निष झटले. ‘शेर शिवराज’ची सुरुवातही जिजाऊंच्या ध्यासापासून होते. हिरण्यकश्यपूला मारणाऱ्या नरसिंहाच्या गोष्टीचं रूपक जोडत लांजेकर यांनी अफझल खान वधाच्या या गोष्टीची सुरुवात केली आहे. अफझल खान वध ही स्वराज्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना. त्यामुळे मुळात अफझल खान कुठून आला, आदिलशहाचा वफादार सेनापती म्हणून मिरवणारा अफझल खान कसा होता? त्याचा निर्दयीपणा, रयतेवरचे अत्याचार, खुद्द शहाजीराजांना त्याच्यापायी सहन करावी लागलेली मानहानी अशा कित्येक आपल्याला माहिती नसलेल्या इतिहासातील गोष्टी दिग्दर्शकाने कथेच्या ओघात सहज आपल्यासमोर ठेवल्या आहेत.

अफझल खानाच्या वधाची गोष्ट अनेकांना परिचयाची आहे. जावळीचे मोरे, तिथलं घनदाट जंगल, अफझल खानाचं एकेकाळी वाईचं सुभेदार असणं अशा आपल्याला माहिती असलेल्या अनेक गोष्टी यात संदर्भापुरती येतात. त्यापेक्षा महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टी, संदर्भ दिग्दर्शकाने कथेत गुंफले आहेत. दिग्दर्शन – लेखन दोन्ही धुरा दिग्पाल लांजेकर यांनीच सांभाळल्या असल्याने त्याचाही प्रभावी परिणाम पटकथा आणि दिग्दर्शनाच्या दोन्ही मांडणीत दिसून येतो. राजांचा पराक्रम हा त्यांच्या सरदार – मावळय़ांशिवाय अपूर्ण आहे. कान्होजी जेधे, येसाजी कंक, पिलाजी गोळे, संभाजी कोंढळकर, सर्जेराव जेधे, सरनोबत नेताजीराव पालकर, दीपाई बांदल यांच्या जोडीने अगिन्या, जिवाजी महाले, विश्वास दिघे अशा कितीतरी व्यक्तिरेखा आपल्यासमोर येतात. यांच्याविषयी आपण क्वचित काही ऐकलेलं असतं, पण हे सगळे अफझल खानाच्या वधावेळी या ना त्या भूमिकेतून महाराजांबरोबर होते. या प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्टय़ होतं. या सरदारांची एका वेगळय़ाच पद्धतीने ओळख दिग्दर्शकाने सुरुवातीच्या काही मिनिटांत करून दिली आहे. एकेकाचं नाव आणि व्यक्तिमत्त्वही असं की पाहणाऱ्याला कापरं भरावं. हा थरार फक्त त्यांची ओळख करून देणाऱ्या प्रसंगातूनही जाणवतो, ही दिग्दर्शकाची कमाल. अशा छोटय़ा-छोटय़ा प्रसंगातून मांडणीत ताजेपणा, नवेपणा ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. किती बारकाव्यांनिशी महाराज विचार करत होते, आपल्या सरदारांची त्या त्या कामासाठीची अचूक निवड, शत्रूच्या शारीर ठेवणीपासून त्याच्या मानसिक प्रकृतीपर्यंत सगळय़ाचा केलेला अभ्यास, शस्त्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं निरीक्षण-अभ्यास या सगळय़ातून हा जाणता राजा उलगडत जातो.

‘शेर शिवराज -स्वारी अफझल खान’ हा दिग्पाल लांजेकर यांच्या प्रस्तावित ‘शिवाष्टक’ चित्रपट मालिकेतील चौथा चित्रपट. याआधी तीन चित्रपटांमधून आपण शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी पाहिल्या आहेत. अनेकदा अशा पद्धतीने चित्रपट मालिका करत असताना त्या त्या व्यक्तिरेखा आणि त्यातील कलाकारांचे ठरलेले चेहरे यांच्यातील तोचतोचपणा जाणवण्याचा धोका असतो. त्याउलट, अनेकदा एकदा एखादी व्यक्तिरेखा आणि ती साकारणारा कलाकार यशस्वी ठरला की त्या जोरावर त्याच्या पुढच्या मालिका किंवा पर्व यशस्वी ठरतात अशीही उदाहरणं आहेत. ‘शेर शिवराज’ साकारताना या दोन्ही गोष्टींचा दिग्दर्शकाने खूप बारकाईने विचार केलेला जाणवतो. त्यामुळे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि जिजाऊंच्या भूमिकेतील मृणाल कुलकर्णी वगळता बाकी सगळय़ा व्यक्तिरेखा आणि कलाकारांच्या चेहऱ्यात अदलाबदल करण्यात आली आहे. खुद्द बहिर्जी नाईकांची भूमिका दिग्दर्शकाने स्वत:कडे घेतली आहे. अनेक नवे चेहरेही यात पाहायला मिळत असल्याने नवेपणा राखण्यासाठी या गोष्टी कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत.

ऐतिहासिकपट साकारणं हे फक्त लेखक -दिग्दर्शकाचं एकटय़ाचं काम नाही. त्यासाठी तंत्राची जोडही आवश्यक आहे आणि कलाकारांमध्येही ती ऊर्जा असणं खूप महत्त्वाचं आहे. पटकथेनुसार मांडणी करताना दिग्दर्शकाने गाण्यांचा भडिमार करण्याचं टाळलं आहे. त्यामुळे मूळ कथेशी प्रेक्षक जोडलेला राहिला आहे. या चित्रपटातील युद्धाचे प्रसंग अगदी मुख्य अफझल खानाच्या वधाचा प्रसंगही उत्तम वठला आहे. इतक्या सुंदर आणि वास्तव मांडणी करण्यात यशस्वी ठरलेल्या चित्रपटातील एखाद दुसरा महत्त्वाचा प्रसंग व्हीएफएक्सच्या बाबतीत का सुमार असावा? हा प्रश्न सतावल्याशिवाय राहत नाही. काही प्रसंगांमध्ये चित्रपट थोडा रेंगाळल्यासारखा जाणवतो, अर्थात इतिहास म्हणून त्या प्रसंगांचा उल्लेख दिग्दर्शकाला महत्त्वाचा वाटला असावा. कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट म्हणजे पर्वणी आहे. शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी अत्यंत तडफेने साकारली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास संपूर्ण देहबोलीतून तितकाच प्रभावीपणे दिसतो. जिजाऊंची तळमळ, त्यांचं एका क्षणातलं करारीपण आणि दुसऱ्याच क्षणी हळवं होणं या मिश्र छटा मृणाल कुलकर्णी यांनी अप्रतिम साकारल्या आहेत. वर म्हटल्याप्रमाणे बहिर्जीच्या भूमिकेत खुद्द दिग्दर्शकाने कमाल केली आहे. रवींद्र मंकणी, वर्षां उसगावकर, अजय पूरकर, विक्रम गायकवाड, मृण्मयी देशपांडे, समीर धर्माधिकारी अशा कसलेल्या कलाकारांपासून आस्ताद काळे, सुश्रुत मंकणी, सचिन देशपांडे, बिपीन सुर्वे, अक्षय वाघमारे, दीप्ती केतकर, सचिन भिलारे, अक्षय वाघमारे सारख्या नव्या फळीतील कलाकारांची उत्तम भट्टी जमली आहे. अफझल खानाच्या भूमिकेसाठी मुकेश ऋषींची निवडही योग्य ठरली आहे. वैभव मांगले यांनी साकारलेले गोपीनाथ बोकील खासे लक्षात राहतात. त्यांच्याशिवाय ही भूमिका अन्य कोणी साकारूच शकणार नाही, असा सूर प्रेक्षकांमधून सहज उमटतो. कथा-पटकथा, दिग्दर्शन, अभिनय सगळय़ाच बाबतीत हा चित्रपट सरस ठरला आहे. शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचे पर्व उलगडणारी ही कथा जाता जाता पुढच्या चित्रपटाबद्दलही तितकीच उत्कंठा निर्माण करून जाते.. 

शेर शिवराज

दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर

कलाकार – चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, दिग्पाल लांजेकर, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, मुकेष ऋषी, रवींद्र मंकणी, वर्षां उसगावकर, अलका कुबल, वैभव मांगले.