मुंबईतील वर्सोवा येथे सोमवारी शिखा जोशी या मॉडेलचा दुर्देवी मृत्यू झाला. शिखाने आत्महत्या केली अथवा तिची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृत्यूसमयी तिने मैत्रिणीबरोबर साधलेल्या संवादातून प्रसिद्ध कॉस्मेटिक सर्जन डॉ. विजय शर्मा आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप तिने केला. डॉ. शर्मा आणि अन्य काहीजण शिखाला त्रास देत असल्याचे तिच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. शिखाच्या मैत्रिणीने तिचे मृत्यूसमयीचे बोलणे मोबाईलवर रेकॉर्ड केले आहे. सदर रेकॉर्डिंग तपासून पाहावे लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. काम मिळत नसल्याने शिखा गेल्या काही आठवड्यांपासून निराश असल्याचे तिची मैत्रीण मधुभारती पठाणने पोलिसांना सांगितले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण यावर काही बोलू शकत नसल्याचे सांगत शर्मा आपली बाजू मांडताना म्हणाले, कोर्टात आपला गुन्हा सिद्ध होईल, या भितीने शिखाने हे पाऊल उचलले. हे एक ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांचे रॅकेट असून सत्य काय ते बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०११ च्या ऑक्टोबरमध्ये शिखाकडून शर्मावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. स्तनांची तपासणी करून घेण्यासाठी शर्माकडे गेले असता त्यांनी आपला विनयभंग केल्याचे तिने म्हटले होते. त्यावेळी खार पोलिसांनी शर्माला अटक केली होती. त्यानंतर २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये शर्माच्या अंधेरी पश्चिम परिसरातील क्लिनिकवर दगडफेक केल्याप्रकरणी शिखा आणि तिच्या भावाला पोलिसांनी अटक केली. अन्य एका विनयभंगाच्या प्रकरणात शर्माला २००८ साली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, दोन्ही प्रकरणात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
२०११ सालचा खटला अद्याप वांद्रे न्यायालयात सुरू आहे. शिखाच्या आवाजाचे रेकॉर्डिंग कलिना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पडताळणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगत, येत्या काही दिवसांत शर्माची जबानी नोंदवून सर्व संशयितांची तपासणी करणार असल्याचे डी. एन. नगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त समाधान धांडेकर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा