बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राजच्या अटकेनंतर शिल्पा सोशल मीडियावर प्रत्येक वेळी कोणता तरी मेसेज देताना दिसते. यावेळी तिच्याकडून चूक झाली आहे असे तिने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. शिल्पाने शेअर केलेला हा फोटो एका पुस्तकातला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की ‘केलेल्या चूकीची भरपाई आपल्याला आयुष्यभर करावी लागते,’ अशा आशयाची ओळ त्यात दिसत आहे. ही ओळ सोफिआ लॉरेनची आहे. या पोस्टमधील आणखी एका ओळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मी चूक करणार, मी त्या चूकीतून शिकणार आणि स्वत:ला माफ करणार,’ अशी ती ओळ आहे. ‘चूक केली पण ठीक आहे,’ असे स्टिकर शिल्पाने हा फोटो शेअर करत दिले आहे.
शिल्पा काही दिवसांपूर्वी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये परतली आहे. शिल्पा २०१६ मध्ये सुरु झालेल्या ‘सुपर डान्सर’च्या पहिल्या सीझनपासून या शोची परिक्षक आहे. शिल्पासोबत दिग्दर्शक अनुराग बासू आणि कोरिऑग्राफर गीता कपूर हे देखील पहिल्या सीझनपासून शिल्पासोबत शोचे परिक्षक आहेत. पतीच्या अटकेनंतर शिल्पा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये दिसली नव्हती आता १ महिन्यानंतर शिल्पा शोमध्ये दिसली आहे.