सध्या बी-टाऊनमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची. मात्र याबाबत सर्वच माहिती गुपित ठेवण्याचा प्रयत्न दोघांच्याही कुटुंबीयांकडून केला जाताना दिसत आहे. अशात आता यासंबंधी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती रणबीर आलियाच्या लग्नासंबंधी प्रश्न विचारल्यावर त्या फोटोग्राफरला गप्प बस असं सांगताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी तिच्या कारमधून उतरून कुठेतरी जाताना दिसत आहे. अशावेळी तिथे असलेले फोटोग्राफर्स तिला आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाबाबत प्रश्न विचारतात, ‘आता आलिया आणि रणबीरचं लग्न आहे. यावर काय सांगशील?’ फोटोग्राफर्सच्या या प्रश्नावर शिल्पा म्हणाली, ‘अरे गप्प बसा यार… त्यांचं लग्न आहे यावर मी काय बोलू. होऊन जाऊ दे लग्न.’

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नवर शिल्पा शेट्टीच्या या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. फक्त शिल्पा शेट्टीच नाही तर रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनाही जेव्हा फोटोग्राफर्सनी या दोघांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. ‘प्रश्न विचारू नका’ असं म्हणत त्या हसत हसत निघून गेल्या होत्या.

दरम्यान सध्या आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. आलिया आणि रणबीर आरके हाऊसमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. याच ठिकाणी रणबीरच्या आई- वडिलांचंही लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या तारखेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तसेच स्वतः आलिया आणि रणबीर यांनीही त्यांच्या लग्नाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

Story img Loader