गेल्या काही दिवसांपासून ‘हंगामा २’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हंगामा या चित्रपटाचा सीक्वल आहे. येत्या २३ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत होता. आता त्या पाठोपाठ या चित्रपटातील गाणे ‘चुरा के दिल मेरा 2.0’ प्रदर्शित झाले असून चर्चेत आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हंगामा २’ चित्रपटातील गाणे ‘चुरा के दिल मेरा 2.0’ शेअर केले आहे. या गाण्यावर शिल्पा आणि मिजान यांचा डान्स पाहण्यासारखा आहे. दरम्यान शिल्पाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. ‘चुरा के दिल मेरा 2.0’ या गाण्यातील शिल्पाचा डान्स पाहून चाहते आनंदी झाले आहेत.

‘चुरा के दिल मेरा’ हे गाणे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचा चित्रपट ‘मै खिलाडी तू अनाडी’मधील आहे. हे गाणे त्यावेळी सुपरहिट ठरले होते. आता ‘हंगामा २’ या चित्रपटासाठी ‘चुरा के दिल मेरा’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे.

२००३मध्ये प्रदर्शित झालेला ‘हंगामा’ हा चित्रपट बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. आजही प्रेक्षक तो चित्रपट आवडीने पाहतात. या चित्रपटात परेश रावल, सोमा आनंद, अक्षय खन्ना, रिमी सेन आणि अफताब शिवदसानी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता ‘हंगामा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले आहे. हा चित्रपट २३ जुलै रोजी डिस्नेप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीने कमबॅक केला आहे. २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात शिल्पा शेवटची दिसली होती.

Story img Loader