बॉलिवूडची फिट गर्ल अर्थात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेसचे किती वेड आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. ती कायम तिच्या फिटनेसबाबत सजग असते. त्यामुळेच तिच्या जीवनशैलीमध्ये व्यायाम आणि योग यांना विशेष स्थान आहे. स्वत: फिट राहण्यासोबतच ती इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देत असते. यासाठी तिने योगची सीडी किंवा काही पुस्तकांच्या माध्यमातून महिलांना फिटनेसचे काही धडेही दिले आहेत. त्यानंतर आता शिल्पाने योगचे धडे देण्यासाठी एक खास अॅप तयार केल्याचं समोर आलं आहे.
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच या दिवशी चाहत्यांना एक खास भेट देण्यासाठी शिल्पाने एक अॅप तयार केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून ती चाहत्यांना योगचे धडे देणार आहे. ‘शिल्पा शेट्टी योग’ (SS App)असं या अॅपचं नाव आहे.
योग आणि साधना हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग असला पाहिजे. दिवसातून केवळ १० मिनीटे वेळ स्वत: साठी द्या. त्यासोबतच प्राणायमदेखील आवर्जुन केला पाहिजे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण अनेक वेळा आजारपणात डॉक्टरांकडे धाव घेतो, आणि मग औषधे, गोळ्या यांचं चक्र सुरु होतं. मात्र जर नियमितपणे योग, व्यायाम केला तर आजारपण ओढावणार नाही, असं शिल्पा सांगते. दरम्यान, शिल्पाने आतापर्यंत काही फिटनेस सीडी, पुस्तक लॉन्च केले असून चाहत्यांचा त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.