बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ प्रकरणामुळे वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा याने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. राज कुंद्राच्या वक्तव्यानंतर शिल्पानेही सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने तिच्या या पोस्टमध्ये पती राज कुंद्राला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. शिल्पाने नुकतंच ट्वीटरवर एक फोटो केली आहे. यात शिल्पाने नुकतंच पतीला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलचे प्रसिद्ध कोट्स शेअर केले आहेत. शिल्पाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
या ट्वीटमध्ये शिल्पाने एका वेबसाईटवरील बातमीची लिंक शेअर केली आहे. त्यावर कमेंट करताना ती म्हणाली, “सत्य हे अतूट असते. द्वेष त्यावर हल्ला करु शकतो. अज्ञान त्याची खिल्ली उडवू शकतो. पण शेवटी ते तिथेच असते आणि आहे – विन्स्टन चर्चिल,” असे तिने यात म्हटले आहे.
राज कुंद्राचे स्पष्टीकरण
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अश्लील चित्रफीत बनवणे आणि त्याचं वितरण करणे या गुन्ह्याखाली अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मंजूर झाला आहे. जामिनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रानं या संपूर्ण पॉर्न व्हिडीओ प्रकरणावर मौन सोडलं असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज कुंद्रा यानं यासंदर्भात सविस्तर निवेदन जारी केलं होतं.
त्यामध्ये आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचा दावा देखील त्यानं केला आहे. “प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असून मी अशा प्रकारचे व्हिडीओ बनवण्यात अजिबात सहभागी नव्हतो. हा सगळा प्रकार म्हणजे मला जाणून बुजून टार्गेट करण्याचा होता”, असं राज कुंद्रा म्हणाला.
श्वेता तिवारीचे हॉट फोटो पाहून पहिल्या पतीने केली कमेंट, म्हणाला…
“दुर्दैवाने मी सिद्ध होण्याआधीच माध्यमांकडून आणि माझ्या कुटुंबीयांकडून दोषी म्हणून जाहीर झालो आहे. मला प्रचंड वेदना होत आहेत. अनेक स्तरांवर माझ्या घटनात्मक आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सारंकाही स्पष्टपणे समोर यावं, म्हणून आपण कुठेही लपून बसलो नसल्याचं राज कुंद्रा म्हणाला आहे. “मला वाटलं या मीडिया ट्रायलमार्फत माझ्या प्रायव्हसीचा भंग केला जाणार नाही. माझ्या कुटुंबाला कायमच माझं प्राधान्य राहिलं आहे. याव्यतिरिक्त काहीही माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मला वाटतं की सन्मानाने जगणं हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे आणि माझीही तीच विनंती आहे. हे निवेदन वाचण्यासाठी वेळ काढलात त्यासाठी धन्यवाद. इथून पुढे माझ्या प्रायव्हसीचा सन्मान ठेवा”, असं देखील त्यानं या निवेदनात म्हटलं आहे.