अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या फिटनेसकडे पाहता तिच्या वयाचा अंदाजही लावता येत नाही. वयाची ४५शी ओलांडून गेली असली तरी शिल्पा मात्र अजूनही तरुणच दिसते. वय हा तिच्यासाठी फक्त आकडा आहे. तिच्या फिटनेसकडे ती तितकंच लक्ष देते. शिवाय नियमित वर्कआऊट, डाएट याकडे ती लक्ष केंद्रित करते. दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी वर्कआऊट आणि योगा शिल्पा कधीही चुकवत नाही. तरुणींनाही लाजवेल असा तिचा फिटनेस आहे. आता तर चक्क तिने कहरच केला आहे. विमानतळावरच शिल्पाने वर्कआऊट करायला सुरुवात केली.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विमानतळावर वर्कआऊट करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विमानतळावर असणाऱ्या शटल बसमध्ये तिने वर्कआऊट करण्यास सुरुवात केली. वर्कआऊटसाठी वेळ न मिळाल्याने तिचा हा बहुदा नवीन प्रयोग असावा. पण यामधून फिटनेसबाबत तिचं असणारं प्रेम दिसून येत आहे.
शिल्पा या व्हिडीओमध्ये पुशअप्स, लंग्स आणि पुलअप्स करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर वर्कआऊट करून झाल्यानंतर बसमध्ये असणारे हँडल ती टिश्यू पेपरने साफ करत आहे. शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “मनडे मोटिव्हेशव ऑन दी गो…घरी जात होते. बस रिकामी होती. म्हणून पुलअप्स, पुशअप्स मी केलं आणि माझं बॅक टू होम मिशन पूर्ण झालं.” शिल्पाच्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिली आहे.
आणखी वाचा – कौतुकास्पद! प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘उनाड’ची निवड
शिल्पा नेहमीच वर्कआऊट तसेच योगा करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तसेच ती फिटनेसबाबतही टिप्स देते. वर्कआऊट शिवाय तिचा दिवस पूर्णच होत नाही. आणि म्हणूनच ती आज अनेक तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकते.