कथानकाच्या सलग प्रवाहाची मोडतोड करून प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देणारे मनोरंजन सर्वाधिक लोकप्रिय केले क्वेन्टीन टेरेण्टीनो या हॉलीवूडच्या शैलीबहाद्दर दिग्दर्शकाने. चित्रपटाची गोष्ट ‘अ’ बिंदूपासून ‘ज्ञ’ बिंदूपर्यंत न नेता या कथनबिंदूंना बदलवून तयार झालेले त्याचे ‘रिझव्हॉयर डॉग्ज’ आणि ‘पल्प फिक्शन’ हे सुरुवातीचे दोनच चित्रपट या दिग्दर्शकाची विश्वकीर्ती होण्यास पुरेसे ठरले होते. कथेचा उलटगतीने प्रवास घडविण्याचा किंवा त्याचा क्रम चुकविण्याचा टेरेन्टीनो मार्ग पुढे अनेक दिग्दर्शकांनी अनुसरला आणि दोन हजारोत्तर  चित्रपटांमध्ये अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या वाढू लागली. ख्रिस्तोफर नोलानचा ‘मेमेण्टो’, मार्क वेबचा ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’, डेव्हिड फिंचरचा ‘सोशल नेटवर्क’ ही या प्रकारातील सर्वात लोकप्रिय उदाहरणे आहेत. प्रेक्षकांनी सिनेमा पाहताना आपले डोके शाबूत ठेवण्याची अपेक्षा बाळगणारा उलटगतीचा प्रकार आणि गेल्या दोनेक दशकातील गुन्हेगारी सिनेमांचा आराखडा यांचा अभ्यास ‘शिमर लेक’ या ताज्या चित्रपटामध्ये दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिमर लेक हा हॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर समीकरणात बसणारा सिनेमा नाही. ‘नेटफ्लिक्स’ या संस्थेने चित्रपट निर्मितीत उतरत शुद्ध मनोरंजनमूल्याला पाठबळ देण्याचा विडा उचलला आहे. त्यातून जो नवा समांतर चित्रप्रवाह तयार झाला आहे, त्यातले हे बरे नवे उदाहरण. या चित्रपटाची गोष्ट सुरुवातीकडून शेवटाकडे जात नाही, तर शेवटाकडून सुरुवातीकडे पाहायला मिळते. यात घडणारी घटना एका छोटय़ाशा अमेरिकी खेडय़ातील असल्याने प्रत्येक जण प्रत्येकाला नखशिखांत ओळखणारा आहे.  यातील घटना विचित्र दरोडय़ानंतर पात्रांच्या फसगतीपूर्ण आयुष्याशी निगडित आहेत. हत्या, दरोडा आणि चमत्कृतीपूर्ण माणसांच्या मालिका, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि तिला मदत करायच्या नावाखाली डोक्यावर बसणारी केंद्रीय पोलीस यंत्रणा दाखविणारी उलटगतीची कथा प्रेक्षकांची मजबूत पकड घेणारी आहे. गुन्हा आणि हत्यांचे रहस्य या उलटगतीच्या कथानकातून मांडण्याचे कौशल्य इथे साधले गेले आहे.

चित्रपटाच्या कथानकात आठवडय़ाचा काळ शुक्रवारपासून सुरू होतो. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच खेडेसदृश शहरातील एक बँक लुटली गेली असते. त्या घटनेमुळे स्थानिक दोन पोलिसांच्या डोक्यावर बसण्यासाठी एफबीआयचा दोन पोलिसांचा चमू दाखल झालेला असतो. अन् दोन्ही चमूची आपआपसातील एकमेकांविषयीची मते अकार्यक्षम असल्याची असतात. चित्रपट सुरू होतो एखाद्या कादंबरीतील शीर्षकबाज प्रकरणासारखा. यात अ‍ॅण्डी (रेन विल्सन) नावाची गुन्हेगारसदृश व्यक्ती आपल्याच तळघरात दडून बसलेली असते. त्याच्याकडे पळवून आणलेल्या पैशाचे गाठोडे असते, पण राजरोसपणे ते आणू शकत नाही, कारण चित्रपटाचा नायक झीक साइक्स (बेंजामिन वॉकर) म्हणजेच स्थानिक पोलीस अधिकारी त्याचा लहान भाऊ असतो. हा कर्तव्यदक्षसदृश पोलीस अधिकारी नायक अ‍ॅण्डी आणि त्याच्या मित्रांनीच दरोडा घातल्याच्या खात्रीने अ‍ॅण्डीला पकडून देण्यासाठी दबा धरून बसलेला असतो. झिकला अ‍ॅण्डीच्या लपण्याची जागा कळेस्तोवर अ‍ॅण्डी शिमर लेकच्या दिशेने पळ काढतो. तिथे त्याच्यासाठी भीषण समस्या वाढून ठेवलेली असते. या घटनेनंतर चित्रपट आदल्या दिवशी अ‍ॅण्डीच्या मित्राच्या झालेल्या खुनाकडे जातो आणि शुक्रवार ते मंगळवारच्या काळात घडणाऱ्या उलट घटनांची मालिका दरोडा कुणी आणि कसा टाकला याचा शोध घेण्यासाठी सज्ज होते.

अत्यंत छोटय़ा खेडय़ातील चित्रपटाच्या विषयाला साजेसे गडद-गंभीर वातावरण या चित्रपटात जमून आलेले आहे. चित्रपटातला नायक इथे स्टीव्हन किंग या भय-रहस्य कथाकाराच्या  एका कथासंग्रहाचे वाचन करताना दाखविण्यात आलेला आहे. गंमत म्हणजे ‘डिफरण्ट सिझन’ नावाच्या या कथासंग्रहाच्या सर्व कथांतील वातावरण हे या चित्रपटासारखे आहे. जसजसे चित्रपटाचे कथानक उलटगती घेते तसे आणखी व्यक्ती आणि भीषण घटना द्रुतगतीने समाविष्ट होत जातात. शिमर लेकजवळ एका प्रयोगशाळेत झालेल्या लहान मुलाच्या मृत्यूची घटना समोर येते आणि निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराकडून खंडणी वसुलीचा प्रकार उघड होतो. यातला बँकेतील दरोडा हा प्रकारही गमतीशीर आहे. बावळट दरोडेप्रसंगांच्या परंपरेतला हा प्रसंग आणि त्यानंतर समोर आलेले सत्य शिमर लेकला सूडपटामध्ये परावर्तित करते. दिग्दर्शकाने लावून ठेवलेला चकवा तिथे उलगडायला लागतो आणि ओ हेन्रीच्या धक्कातंत्री कथेसारखा परिणाम प्रेक्षकाला मिळतो.

गुन्हेगारी कथा आणि गुन्हेपट या दोहोंचा मारा प्रेक्षकांवर गेल्या काही दशकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. त्यात चवबदल असलेले उलटगतीचे कथानक हे रहस्यवृद्धीचे आणि प्रेक्षकाला चकवायचे काम करीत असल्याने त्यांच्यातील गुणदोषांसह अशा चित्रपटांना स्वीकारले जात आहे. पुढील काळात असे चित्रपट आणखी स्मार्ट होतीलच, पण तोवर शिमर लेकसारखे आणखी सिनेमे बनणे गरजेचे आहे.