पाकिस्तानविरोधी भूमिकेवरून सध्या आक्रमक झालेल्या शिवसेनेने आता बॉलीवूड कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांना लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. या दोघांनाही त्यांच्या एकाही चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रमोशन करू देणार नाही, असा पवित्रा सेनेने घेतला आहे. फवाद खान आणि महिरा खान यांना विरोध करताना ते काम करत असलेला चित्रपट कोणाचा आहे, याचा विचार आम्ही करणार नाही. करण जोहर, फरहान अख्तर, शाहरूख खान हे देशाचे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या चित्रपटात घेऊ नये, असे सेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सेनेच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेची झळ बॉलीवूडला बसण्याची शक्यता आहे.
२०१४ मध्ये ‘खुबसूरत’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला फवाद खान आगामी काळात ‘कपूर अॅण्ड सन्स’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांतून झळकणार आहे. तर, दुसरीकडे माहिरा खान शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, शिवसेनेने फवाद खान आणि माहिरा काम करत असलेलल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांना पत्र पाठवून तंबी दिली आहे. आम्ही कोणताही पाकिस्तानी कलाकार, खेळाडू किंवा कलाकाराला महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष राहुल बर्दापूरकर यांनी सांगितले. यापूर्वी शिवसेनेच्या विरोधामुळे सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचे मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. याशिवाय, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमंद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाविरोधात सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर केलेली ‘शाईफेक’ चांगलीच गाजली होती.

Story img Loader