मराठी रसिकांची खरी नाळ जोडली आहे ती नाटकांशी! टेक रिटेक पेक्षा लाइव्ह पर्फोर्मंसला टाळ्यांचा कडकडाट करणारे प्रेक्षक आणि त्यात असलेला तुफान उत्साह कलाकाराला स्फुरण चढवणारा आहे. १५० वर्षांपेक्षाही जुनी असलेली नाट्यकला अजूनही फुलतेय. अशा या फुलत बहरत चाललेल्या कलेला एक अशी साक्षीदार वास्तू आहे जी आजही आपल्या पारंपारिक रुपात मानाने उभी आहे. येथे आजही रंगकर्मी आग्रहाने शुभारंभाचा प्रयोग करतात. मुंबई शहराच्या मध्यवर्ती विभागात असलेल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे या कलेशी अतूट नाते जुळले आहे. काळानुरूप नाटकात असलेल्या बदलांचे शिवाजी मंदिर नाट्यगुह साक्षीदार आहे. ३१ डिसेंबर १९४३ रोजी स्थापन झालेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ’ (ट्रस्ट) ने या  बंदिस्त नाट्यगृहाची निर्मिती केली. मुंबई शहरात अशी एक सांस्कृतिक संस्था असावी, जिच्या माध्यमातून कलेचा विस्तार होईल असा व्यापक दृष्टीकोन  घेऊन ३ मे १९६५ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहाची स्थापना झाली. यंदाच्या ३ मे रोजी नाट्यगृह ५० व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. याबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेकर म्हणाले की, शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही आम्ही सगळ्यांनी पाहिले आहेत आणि पहात आहोत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा आम्ही या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले  गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री  दयानंद बांदोडकर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता. ही वास्तू म्हणजे त्याचेच मूर्त स्वरूप आहे.
आशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. शिवाजी मंदिर मध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत.  नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य  चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस,  मा दत्ताराम, डॉ काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे पासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव पर्यंत  सर्वांचेच शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. येथील रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली.  शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे. शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या ५० व्या वर्धापनदिनाचा ७ मे रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या सोहळ्यात माजी कृषी मंत्री (भारत सरकार) मा. श्री. शरद पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा मंत्री श्री. विनोद तावडे तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. सुभाष देसाई स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहे. आमदार जयंत पाटील, माजी आमदार नीळकंठ (भाई) सावंत, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष  मोहन जोशी,  मराठी व्यवसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत (अण्णा) सावंत यांनी दिली.

Story img Loader