मराठीमध्ये एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा देखील वाढला आहे. अशामध्येच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे, ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याच्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप- गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘शिवप्रताप- गरुडझेप… सप्टेंबर २०२२ ला चित्रपटगृहात…जय शिवराय! हर हर महादेव…’ या टीझरमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. “३५६ वर्षांपूर्वी हाच आग्र्याचा लाल किल्ला थरारला होता. मुघलशाही हादरली होती. कारण याच वास्तूमध्ये पेटलं होतं मराठी स्वाभिमानाचं स्फुलिंग. पूर्ण हिंदुस्तानानं अनुभवला होता हा शिवप्रताप” हा संवाद ऐकल्यावर अक्षरशः अंगावर शाहारा येतो.
आणखी वाचा- VIDEO : “अनेकांच्या अनेक शंका होत्या पण…” अमोल कोल्हेंच्या ‘या’ पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष
दरम्यान अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. हा टीझर पाहता यामध्ये दमदार संवाद आणि उत्तम चित्रण पाहायला मिळणार असं दिसतंय. जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. सप्टेंबर २०२२मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.