रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडे आज भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे त्यांचा थाट काही औरच असतो. लग्नकार्य असो किंवा सण-उत्सव प्रत्येक कार्य या कुटुंबात धुमधडाक्यात साजरं केलं जातं. त्याप्रमाणेच मुकेश अंबानींच्या दोन्ही मुलांचं आकाश आणि इशाचं लग्न मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच आकाशचं श्लोका मेहतासोबत लग्न झालं. या सोहळ्यामधील प्रत्येक गोष्ट डोळे दिपवून टाकणारी होती. क्रिकेटविश्वापासून ते कलाविश्वापर्यंत अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्यामध्ये एका गोष्टीने उपस्थित साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं आणि ती गोष्ट म्हणजे संगीत समारंभात श्लोकाने परिधान केलेला लेहंगा. श्लोकाने घातलेला लेहंगा खास असून त्याचं महत्वही तितकंच होतं.
आकाश-श्लोकाच्या लग्नाला आता काही महिने झाले असून या लग्नाची अद्यापही चर्चा होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातच श्लोकाचा संगीत समारंभातील एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या सोहळ्यामध्ये श्लोकाने घातलेल्या लेहंग्यावर चक्क आकाश आणि तिची लव्हस्टोरी गुंफण्यात आली आहे.
प्रसिद्ध डिझायनर क्रेशा बजाज यांनी श्लोकाचा लेहंगा तयार केला असून तो तयार करण्यासाठी ५० हजार क्रिस्टल, सेक्विन आणि मोती यांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या लेहंगामध्ये श्लोका आणि आनंद यांची प्रेमकथा गुंफण्यात आली आहे. जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर असलेला या लेहंग्यावर रेशमी धाग्याने ही कथा विणली आहे. त्यामुळे हा लेहंगा श्लोकासाठी खास असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी हिनेदेखील तिच्या साखरपुड्याला क्रेशा बजाज यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली होती.