गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये चरित्रपट म्हणजेच बायोपिक चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये बॉलिवूड फार अग्रेसर आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन प्रेक्षकांना या पद्धतीचे चित्रपट पाहण्यात रस आहे ही बाब निर्मात्यांच्या लक्षात आली. त्यानंतर सरसकट सगळीकडे चरित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. भारतीय सिनेसृष्टीमध्ये वाहणारं हे चरित्रपटांचं वादळ सध्या आपल्या शेजारील देशामध्ये, पाकिस्तानमध्येही वाहायला लागले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या शोएब अख्तर यांच्या ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या चरित्रपटाची चर्चा आहे.
क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास चालतात असे म्हटले जाते. ‘दंगल’, ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारखे बरेचसे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. यात ‘सायना’, ‘शाबास मिठू’ असे काही अपवाद देखील आहेत. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’च्या निमित्ताने या श्रेणीमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. पाकिस्तानी अभिनेता उमर जैस्वाल शोएबची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याची घोषणा केली.
त्याने या पोस्टला “रावळपिंडी एक्सप्रेसच्या निमित्ताने मला मोठ्या पडद्यावर शोएब अख्तर सारख्या दिग्गज क्रिकेटपटूची भूमिका साकारणं माझ्यासाठी अभिमानस्पद आहे. अल्लाहच्या आशीर्वादाने आम्ही या प्रयत्नांमध्ये नक्की यशस्वी होऊ. आम्ही तयार केलेला हा बायोपिक जागतिक स्तरावर नाव कमावेल ही आम्हाला आशा आहे”, असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये उमर पाठमोरा उभा असून त्याने शोएब अख्तरची १४ अंक असलेली जर्सी घातलेली आहे.
या चित्रपटाची पार्श्वभूमी १९७५ ते २००२ या वर्षांमधली असणार आहे. शोएब अख्तर नव्वदच्या दशकामध्ये त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. वेगवान गोलंदाजीच्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणाऱ्या या क्रिकेटपटूला लोक ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखतात. हेच नाव शोएब अख्तरची ओळख बनल्यामुळे त्याच्या चरित्रपटासाठी या नावाचा वापर करण्यात आला आहे.