गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पणजी येथील एका बँकेजवळ दुचाकीवरील दोन महिलांबरोबर लैंगिक छळ केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. या दोघींपैकी एक अभिनेत्री असून तिनेच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने तक्रारीत सांगितलं की ती आणि तिची मैत्रीण रात्री १०.१५ वाजता घरी परतत असताना ही घटना घडली.

“आरोपी दुचाकीवर होता. तो आमच्याकडे पाहून हस्तमैथुन करत होता आणि त्याने आमच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली,” असं तक्रारीत अभिनेत्रीने सांगितलं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.

अभिनेत्रीची पोस्ट

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात तिने घडलेला प्रकार सांगितला आहे. आज, मी आणि माझी मैत्रीण दुचाकीवरून जात असताना, एक माणूस “एक्सक्युज मी” म्हणत चांगली व्यक्ती असल्याचं भासवत आमच्याजवळ आला. पण आम्ही बारकाईने पाहिलं तेव्हा तो एका हाताने दुचाकी चालवत असल्याचं आणि दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करत असल्याचं दिसलं. त्यावेळी त्याने आमच्यासाठी अपशब्दही वापरले.

हा किळसवाणा प्रकार पाहून आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि तिथून निघून आलो. पण आमच्या डोक्यात आता सतत विचार येत आहेत की आम्ही आरडाओरडा करायला हवा होता का? त्याला जाब विचारायला हवा होता? की त्याची तक्रार करायला हवी होती? पण सत्य हे आहे की, अशावेळी भीती या सगळ्या गोष्टींपेक्षा वरचढ ठरते.
कारण अशा नराधमांचा सामना करताना स्त्रियांना भीती वाटणं स्वाभाविक आहे.
या पुरुषांना इतकं भयंकर कृत्य करण्याचा आत्मविश्वास कशामुळे मिळतो? यातून त्यांना कसला थ्रील मिळतो? ते कधी घाबरणार? कोणाला त्रास देण्याआधी ते कधी विचार करतील?
पण अर्थातच यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे, आम्हा मुलींना “घरी राहा” “सुरक्षित राहा” असं सांगणं आहे, नाही का??” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं.

पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर पीडितेशी संपर्क साधला आणि सोमवारी दुपारी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हेगारी हेतूने तो या दोघींचा पाठलाग करत होता, असंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे संशयिताची ओळख पटवली आहे, असं पोलीस म्हणाले.

“संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. त्याच्याविरोधात लैंगिक छळ आणि POCSO अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तो सध्या २०२४ च्या एका प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथकांकडून छापेमारी सुरू आहे,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader