‘शोले’ चित्रपटाचा प्रभाव आजही इतका कायम का आहे, हे सांगणे कठीण असले तरी या चित्रपटाने विधवा पुनर्विवाहाचा संदेश त्यावेळी देण्याचा प्रयत्न केला होता ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितले. भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘शोले’ चित्रपटाला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमिताभ यांनी ‘शोले’शी निगडीत अनेक आठवणींवर प्रकाशझोत टाकला. चित्रपटात राधा (जया बच्चन) आणि जय(अमिताभ) यांच्यात कोणत्याही संवादाविना फुललेल्या प्रेमकथेच्या माध्यमातून विधवा पुनर्विवाहाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा विचार महत्त्वाचा होता, असे मत अमिताभ यांनी यावेळी व्यक्त केले. ‘शोले’च्या चित्रीकरणावेळी जया गर्भवती होती त्यामुळे माझी मुलगी श्वेताला ‘तु सुद्धा चित्रपटात काम केले आहेस’ असे मी विनोदाने सांगत असे, असेही अमिताभ यांनी सांगितले. त्यामुळे शोले चे माझ्या वैयक्तिक जीवनात फार महत्त्व आहे. ‘शोले’ने आपल्याला भरपूर काही शिकवले असून ‘शोले’मुळे चित्रपटात पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्टंट पाहायला मिळाले आणि आम्हाला ते करायला, असेही ते पुढे म्हणाले.
चित्रपटातील खलनायक गब्बरची भूमिका करण्याच्या इच्छेचाही पुनरुच्चार यावेळी अमिताभ यांनी केला. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आणि चित्रीकरणादरम्यान सेटवर आम्ही सर्व कुटुंबासारखेच वावरत होतो यातच चित्रपटाचे यश दडले आहे. चित्रपटातील संवाद इतके आकर्षक होते की गाण्यांच्या सीडीसोबत चित्रपटांतील संवादांचीही सीडी काढावी लागली. त्यामुळे चित्रपटातील नेमका कोणता संवाद आवडला हे सांगणे कठीण आहे. सर्वच संवाद दमदार आहेत, असेही ते अमिताभ पुढे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा