बॉलिवूडमधील ७०च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘शोले.’ हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘शोले’ हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे ज्याने रुपेरी पडद्यावर १०० दिवस आपली जादू कायम ठेवली होती. या चित्रपटात सध्याचे बडे कलाकार अमिताभ बच्चन, जया बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि अमजद खान मुख्य भूमिकेत होते. ‘शोले’ चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ऐतिहासिक चित्रपट आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाशी संबंधीत काही खास किस्से…
सुरुवातीला चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव ‘एक दो तीन’ असे ठेवले होते. चित्रपटाच्या आर्ध्या चित्रीकरणानंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘शोले’ ठेवण्यात आले. चित्रपटातील गब्बर सिंग हे पात्र वास्तविक जीवनातील एका व्यक्तीवर आधारलेले होते. त्या व्यक्तीचे बोलणे, चालणे हुबेहूब चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी रमेश यांनी परदेशातून तंत्रज्ञ बोलवले होते. या तंत्रज्ञ्यांनी अभिनेता जेम्स बॉन्ड यांच्या चित्रपटासाठी काम केले होते. चित्रपटासाठी एक खास घोडा बंगळूरूवरुन मागवण्यात आला होता. त्या घोड्याचे नाव रॉकेट असे होते आणि या घोड्यावर बसून चित्रपटातील अनेक स्टंट करण्यात आले होते.
चित्रपटात संजीव कुमार यांनी ठाकूरची भूमिका साकारली होती. परंतु ही भूमिका धर्मेंद्र यांना साकारायची होती. त्यावेळी धर्मेंद्र आणि संजीव कुमार या दोघांनाही हेमा मालिनी आवडत होत्या. त्यामुळे चित्रपट निर्माते रमेश यांना प्रश्न पडला होता की ठाकूरची भूमिका आणि वीरुची भूमिका नेमकी कोणाला द्यावी. नंतर विचार करुन त्यांनी धर्मेंद्र यांना समजावले आणि धर्मेंद्र हे वीरुची भूमिका साकारण्यास तयार झाले.