नाणं उडवून गोष्टी ठरवायच्या ही वीरू आणि जयची खासियत होती. चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात जय मेल्यानंतर वीरूला प्रचंड दु:ख होतं. मांडीवर असलेल्या जयकडे पाहून रडणारा वीरू, त्याला ते नाणं सापडतं. त्या नाण्याला दोन्हीकडे छापा आहे हे कळल्यानंतर वीरूचं दु:ख आणखी वाढतं. रागाच्या भरात किं वा दु:खाच्या भरात म्हणा तो ते नाणं फेकून देतो. ते नाणं घरंगळत, घरंगळत एको ठिकाणी जाऊन शांतपणे स्थिरावतं. ४० वर्षांपूर्वी जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्या नाण्याचं घरंगळणं, त्याचा तो आवाज स्टिरिओफोनिक साऊंडमध्ये अगदी स्पष्टपणे प्रेक्षकोंनी ऐकला होता. मी स्वत: चित्रपटगृहात होतो. जयचा मृत्यू, ते नाणं आणि त्या नाण्याचं घरंगळत जाऊन विसावणं हा खूप भावनिकदृष्टय़ा एकदम तणावाचा प्रसंग होता आणि प्रेक्षकांमध्ये काहीसा हशा पिकला. त्यांना आनंद वाटला..
आज ४० वर्षांनंतर ‘शोले’मध्ये एकच गोष्ट मला बदलावीशी वाटली ते म्हणजे नाण्याचं हे दृश्य.. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या ‘शोले’ चित्रपटाचा कर्ताकरविता, दिग्दर्शक रमेश सिप्पी आपल्याच चित्रपटाबद्दल ४० वर्षांनंतर ही मोठी ‘चूक’ झाली होती असं म्हणत होते. नाण्याचा हा प्रसंग प्रेक्षकांच्या दृष्टीने फारच क्षुल्लक असेल. त्यांनी त्या नाण्याच्या आवाजाची आणि ७० एमएमच्या त्या भव्य पडद्यावरच्या त्या दृश्याची मजा घेतली. यात त्यांची काहीच चूक नाही. पण, दिग्दर्शक म्हणून ‘शोले’च्या जय-वीरूशी पहिल्या तीन तासांत तयार झालेला भावनिक बंध मी माझ्याच हुशारीने झटक्यात तोडला याचं मला खूप वाईट वाटतं. नाण्याचं हे अशा प्रकारे घरंगळत जाणं मी दुसऱ्या कुठल्या तरी दृश्यात जोडू शकलो असतो. प्रेक्षकांना त्या तांत्रिक करामतीचा निखळ आनंद घेता आला असता. पण, मी भलत्याच ठिकाणी ती करामत जोडली. ‘शोले’त काय चुकलं?, असं विचारलं की मला त्याची जाणीव होते आणि हा एक बदल मी करू शकलो असतो तर.. ही शक्यता ४० वर्षांनंतरही छळते, अशी निखळ कबुली रमेश सिप्पी यांनी दिली.
१५ ऑगस्ट १९७५ ला ‘शोले’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला आज ४० वर्ष झाली. ‘शोले’च्या चाळिशीनिमित्ताने त्याच्याभोवती निर्माण झालेल्या अनेक दंतकथा, अनेक शंका-कुशंका यांना दिग्दर्शक रमेश सिप्पींनी ‘एनसीपीए’मध्ये झालेल्या मुलाखतीत मनमोकळी उत्तरे दिली. ‘शोले’ करताना तो इतका भव्य चित्रपट ठरेल, याची पुसटशीही कल्पना आपल्याला नव्हती, असं त्यांनी सांगितलं. ‘सीता और गीता’ प्रदर्शित झाला होता. चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यामुळे काहीशा आनंदी मूडमध्ये आम्ही होतो. अर्थात, त्यानंतर काय? हा प्रश्नही सुरू झाला होता. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी माझे वडील जी. पी. सिप्पी, सलीम-जावेद आणि मी एकत्र आलो. यावेळी पाश्चिमात्य सिनेमापेक्षाही भव्य असा सिनेमा करायचा, हा एकच विचार पक्का झाला. मग सलीम-जावेदनी कथा लिहायला सुरुवात केली. पण, मुळात ‘शोले’ची सुरुवातच मोठा चित्रपट करायचा या कल्पनेने झाली होती. चित्रपटासाठी बजेट ठेवलं होतं ते १ कोटी रुपयांचं. त्यावेळी हा आकडा खूप मोठा होता. दोन वर्षांनी चित्रपट पूर्ण झाला तेव्हा ३ कोटी रुपयांपर्यंत बजेट पोहोचलं होतं. पण, मला एकच समाधान होतं की या दोन वर्षांत मी ज्या पद्धतीने चित्रपट करायचा ठरवला होता त्या पद्धतीनेच तो पूर्ण करण्यासाठी घरच्यांनी मला पाठिंबा दिला. माझे वडील या व्यवसायात मुरलेले होते. पण, बजेटचा आकडा वाढल्यानंतरही त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. मी काहीतरी वेगळा चित्रपट करतो आहे, याची खात्री त्यांना पटली होती. त्यामुळे ‘शोले’च्या चित्रीकरणासाठीही परदेशी तंत्रज्ञांची मदत आम्ही घेतली होती. कॅमेऱ्याची उपकरणे, फाईट सीन, एडिटिंग अशा कित्येक गोष्टींसाठी आम्ही परदेशी तंत्रज्ञांची मदत घेतली होती. त्यामुळे कुठेतरी दर्जात न केलेली तडजोड या सिनेमासाठी खूप फायदेशीर ठरली, असे सिप्पींनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा