‘शोले’ने भारतातील पिढय़ान्पिढय़ांवर आधिराज्य गाजवले आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय चित्रपट असे ज्या चित्रपटाचे वर्णन केले जाते त्या ‘शोले’तील खलनायक गब्बरसिंग याची पूर्वकथा कॉमिक बुक आणि अॅनिमेटेड स्वरूपात सादर केल्यानंतर आता याच गब्बरसिंगशी लढा देणाऱ्या ठाकूर बलदेवसिंह, सुरमा भोपाली आणि गब्बरचा सहकारी साम्बा यांच्याही कथा कॉमिक बुकबरोबरच अॅनिमेटेड मालिकांच्या रूपात आणणार असल्याची माहिती ‘ग्राफिक इंडिया’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शरद देवराजन यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना
दिली.
सध्या ‘द साधू’ या भारतीय कॉमिक हीरोवर हॉलीवूडपटाची निर्मिती क रण्याचे काम ‘ग्राफिक इंडिया’ करते आहे. त्याच वेळी ‘ग्राफिक इंडिया’ने भारतातही ‘शोले’ चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक गब्बरसिंगची कथा पहिल्यांदाच कॉमिक कथेच्या स्वरूपात आणली असून त्याच्यावरची मोबाइल अॅनिमेटेड सीरिजही ‘व्ह्य़ूक्लिप’ या मोबाइल व्हिडीओ कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आणली आहे. गब्बरसिंगला कॉमिक खलनायक म्हणून आणण्याची कल्पना ‘शोले थ्रीडी’च्या निर्मात्या साशा सिप्पी यांची होती, असे देवराजन यांनी सांगितले.
‘शोले’ हा आजवरचा सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. त्यातल्या अगदी लहान-लहान व्यक्तिरेखांनीही लोकांच्या मनावर गारुड केले आहे. त्यामुळे अॅनिमेशन किंवा चित्रकथांचा प्रभाव काय असू शकतो हे माहीत असणाऱ्या आजच्या तरुण पिढीला या फिल्मी व्यक्तिरेखांची कॉमिक कथा ऐकायला आणि पाहायला नक्कीच आवडेल. ‘माव्र्हल’ आणि ‘डीसी’सारख्या कॉमिक सुपरहीरोंचा आज हॉलीवूडवरही प्रभाव आहे. तसाच परिणाम गब्बरसिंग आणि त्यांच्या व्यक्तिरेखांचाही होईल, या विश्वासाने साशा सिप्पी यांनी हे काम आपल्या कं पनीकडे दिले होते, अशी माहिती देवराजन यांनी दिली. या भारतीय व्यक्तिरेखा कॉमिक बुकमध्ये आणण्याचे आव्हान स्वीकारल्यामुळे आपल्या देशातील अॅनिमेशन इंडस्ट्री विस्तारण्यासही हातभार लागणार आहे. त्यामुळे ‘ग्राफिक इंडिया’ने अशा प्रकारे भारतीय व्यक्तिरेखा जास्तीत जास्त अॅनिमेटेड स्वरूपात आणण्याचा चंग बांधला असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘शोले’तला गब्बर पाहिल्यानंतर खलनायक जन्मापासूनच वाईट असतात की ते वाईट बनतात?, हा प्रश्न कित्येकांच्या मनात डोकावून जातो. ही उत्सुकताच मग एक कथाबीज बनून जाते. गब्बरच्या बाबतीत हाच विचार आम्ही पुढे नेला. एकदा गब्बरसिंगची कथा करायची ठरवल्यानंतर त्याच्या जन्मापासूनची कथा सौरभ मोहपात्रा या लेखकाने आणि त्याच्या टीमने लिहिली आणि मग हा गब्बर तपशिलांसह कॉमिक कथेत अवतरला होता. आता त्याच धर्तीवर ठाकूरची कथा, सुरमा भोपालीला घेऊन त्याच्यावर एक वेगळीच विनोदी कथा आणि साम्बासारख्या छोटय़ा व्यक्तिरेखेलाही कॉमिक कथेत उतरवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे देवराजन यांनी सांगितले.
‘शोले’चे ठाकूर, सुरमा भोपाली, साम्बाही कॉमिक बुकमध्ये अवतरणार!
‘शोले’ने भारतातील पिढय़ान्पिढय़ांवर आधिराज्य गाजवले आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय चित्रपट असे ज्या चित्रपटाचे वर्णन केले जाते
First published on: 25-03-2014 at 06:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sholays thakursurma bhopalisamba in comic book