मुंबईतील गुन्हेगारी टोळ्या, टोळीयुद्ध, डी गँग असो की हाजी मस्तान, या गुन्हेगारांच्या संदर्भात आणि त्यांनी केलेल्या टोळीयुद्धांवर आधारित अनेक चित्रपट येऊन गेलेत. ‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’ हाही मन्या सुर्वे नामक ८० च्या दशकातील एका गुंडाचा आणि त्याच्या टोळीचा उदयास्त दाखविणारा चित्रपट भरपूर हाणामारी, मुंबईतील नामचीन गुंडांचे परिसर, ७०-८०च्या दशकातील मुंबईचे ओघाने येणारे चित्रण करणारा आहे.
मुळात हुसैन झैदी लिखित ‘डोंगरी टू दुबई : सिक्स डीकेड्स ऑफ दि मुंबई माफिया’ या पुस्तकावरच आधारित असल्यामुळे तारीखवार घटनाक्रम दिग्दर्शकाने दाखविला आहे. जॉन अब्राहमने साकारलेला मन्या सुर्वे हा ‘अ‍ॅण्टी हीरो’ आणि पुस्तकातील अस्सल व्यक्तिरेखांना पडद्यावर साकारण्यात यशस्वी झालेला दिग्दर्शक यामुळे चित्रपट यशस्वी ठरलाय. पण चित्रपट बटबटीत गँगस्टरपट आणि अ‍ॅक्शनपट झाला आहे.
मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे याला मुंबई पोलिसांनी चकमकीत ठार केले. ही घटना वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयाजवळ घडली होती. पहिली चकमक म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मनोहर सुर्वे हा आगर बाजारात राहणारा सर्वसामान्य चाळकरी. सावत्र भावासारखे न बनण्यासाठी शिक्षण घेऊन, कुठे तरी छोटी-मोठी नोकरी करावी आणि आयुष्य काढावे अशी मानसिकता असलेला तरुण; परंतु काही घटनांमुळे तो अखेरीस मुंबईतील नामचीन आणि ‘वॉन्टेड’ गुंड बनतो. पोलीस व्यवस्था आणि गुंडटोळ्यांशी असलेला पोलीस यंत्रणेचा संबंध, या व्यवस्थेचा बळी ठरल्याने निर्माण झालेला गुंड मन्या सुर्वे ही सगळी कारणमीमांसा चित्रपट स्पष्ट करतो. हे वास्तव विदारक आहे; परंतु ते अधोरेखित करीत असतानाच तद्दन व्यावसायिक गल्लाभरू चित्रपट कसा निर्माण होईल, यासाठी दिग्दर्शकाने चपखलपणे त्याचा वापर केला आहे.
मनोहर सुर्वे तर सरळ-साधा मराठी तरुण. त्याचा सावत्र भाऊ भार्गवला मारायला गुंड येतात, तेव्हा विद्या (कंगना राणावत) मनोहरच्या घरी आलेली असते. भार्गवला प्रचंड मारहाण करताना तिला पाहवत नाही. ती त्याला वाचविण्यासाठी मनोहरला सांगते. तिच्या सांगण्यावरून मनोहर मध्ये पडतो आणि भाऊ भार्गवला वाचवितो. आणि लगेचच भार्गव विरोधी टोळीच्या गुंडाला चाकूने भोसकून ठार करतो. इथपासून चित्रपट प्रेक्षकाची पकड घेतो. पुढे याच घटनेमुळे तुरुंगाची हवा खावी लागलेला मनोहर तुरुंगातून बाहेर पडतानाच मन्या सुर्वे बनतो. अखंड चित्रपटभर टोळीयुद्ध तरी सुरू राहते किंवा पोलीस विरुद्ध गुंड हा संघर्ष तरी चालू राहतो.
जॉन अब्राहमने साकारलेला मन्या सुर्वे हा चित्रपटाचा ‘अ‍ॅण्टी हीरो’ असल्यामुळे ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिमत्त्व, त्याचे शरीरसौष्ठव यामुळे तो भाव खाऊन न गेला तरच नवल. गरम डोक्याचा मन्या सुर्वे साकारताना जॉन अब्राहमने अभिनय करण्याचाही प्रयत्न केलाय; परंतु अतिशय भडक चित्रण, वारंवार घुसडलेली ‘आयटम साँग्ज’, बाई, बाटली आणि बंदूक यामध्ये रमलेले समस्त टोळीबहाद्दर म्होरके यामुळे चित्रपट खूपच भडक  झालाय आणि बटबटीतपणाकडे झुकतो.
‘..लोखंडवाला’चा सिक्वेलपट न होता खरे तर हा चित्रपट ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’च्या जवळ जाणारा ठरलाय. नावीन्य नसले तरी जॉन अब्राहमची बॉलीवूड प्रतिमा आणि त्याची अ‍ॅक्शन यासाठी पाहायला हरकत नाही.
शूटआऊट अ‍ॅट वडाळा
निर्माते – संजय गुप्ता, अनुराधा गुप्ता, एकता कपूर, शोभा कपूर
दिग्दर्शक – संजय गुप्ता
मूळ कथा – हुसैन झैदी
पटकथा – संजय गुप्ता, संजय भाटिया, अभिजीत देशपांडे
संवाद – मिलाप झवेरी
छायालेखन – संजय एफ. गुप्ता, समीर आर्य
संकलन – बंटी नागी
कलावंत – जॉन अब्राहम, अनिल कपूर, तुषार कपूर, कंगना राणावत, सनी लिओन, जॅकी श्रॉफ, मनोज बाजपेयी, सिद्धान्त कपूर, रणजीत, सोनू सूद, महेश मांजरेकर, रोनित रॉय, सोफिया चौधरी, प्रियांका चोप्रा व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा