‘उडता पंजाब’ चित्रपटानंतर लगेचच आणखी एका राज्यातील सत्य घटनेच्या अनुषंगाने वास्तव मांडणारा चित्रपट पाहायला मिळावा, हा खरं तर चांगला योग म्हणायला हवा. मुझफ्फरनगरमध्ये २०१३ साली झालेल्या दंग्यांच्या पाश्र्वभूमीवरची कथा ‘शोरगुल’ या चित्रपटात रंगवण्यात आली आहे.
दोन धार्मिक समाजांच्या गुणावगुणांचा वापर करून राजकीय स्वार्थासाठी त्यांच्यात घडवले जाणारे दंगे कधीकाळी एकोप्याने नांदणारं एक गाव होत्याचं नव्हतं करून टाकतात, ही परिस्थिती मुझफ्फरनगरच काय त्याआधीही कित्येक दंग्यांनी आपल्याला दाखवून दिली आहे. दंगलींशी जोडले गेलेले राजकारण हेही कित्येक चित्रपटांमधून दाखवण्यात आले आहे. दुर्दैवाने, जितेंद्र तिवारी दिग्दर्शित ‘शोरगुल’मध्ये सत्य घटनेपेक्षाही थोडय़ाफार फरकाने याच गोष्टी पाहायला मिळतात. गावातले प्रस्थ असलेले चौधरी (आशुतोष राणा) जे हिंदू-मुस्लीम भेदभाव न करता माणुसकीचा धर्म मानतात. त्याच्या उलट त्यांचा पुतण्या रणजीत ओम पैशासाठी, सत्तेसाठी गावात धर्माच्या नावाखाली फू ट पाडून मुस्लिमांच्या जमिनी आपल्या नावावर करण्यात दंग आहे. चौधरींचा मुलगा रघु (अनिरुद्ध दवे) आणि त्यांच्या शेजारी राहणारी झेहनम (सुहा) दोघांमध्ये लहानपणापासून मैत्री आहे. झेनमचा निकाह सलीमशी (हितेन तेजवानी) ठरला आहे. सलीमचाही माणसांना जोडणाऱ्या इस्लामवर विश्वास आहे. मात्र त्याच्या घरीही त्याच्या चुलत भावाच्या (एजाझ खान) निमित्ताने धर्माध इस्लामचं वादळ घरात शिरतं. रघुला झेनमबद्दल वाटणाऱ्या अव्यक्त प्रेमाचा फायदा घेत एकीकडे ओम आणि दुसरीकडे सलीमच्या भावाच्या माध्यमातून हिंदू विरुद्ध मुस्लीम वणवा पेटतो. हा वणवा विझवण्यात स्थानिक प्रशासनही हतबल ठरते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही मात्रा चालत नाही. सगळ्याची राखरांगोळी होते.. मुझफ्फरनगरमध्ये पेटलेल्या दंगलीमध्येही असाच काहीतरी तकलादू वाद कारणीभूत झाला होता म्हणण्यापेक्षा तो घडवून आणला होता. या सगळ्याचे चित्रण घडवणारा हा चित्रपट त्यावेळी हतबल ठरलेल्या प्रशासनाच्या, राज्य आणि केंद्रीय स्तरावरील नेतृत्वाच्या मानसिकतेचा वेध घेण्यात कमी पडतो.
मुझफ्फरनगरच्या दंगलीचा संदर्भ घेत चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापासून दंगलीसाठी कारणीभूत ठरलेल्या संगीत सोमपर्यंत अनेक साधम्र्य सांगणाऱ्या व्यक्तिरेखा चित्रपटात पाहायला मिळतात. चित्रपटाचे संवादही उत्तम आहेत. जिम्मी शेरगिल ते संजय सुरी असे अनेक चांगले कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. एकेकाळी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असलेल्या हितेन तेजवानीलाही इतक्या काळाने एका चांगल्या भूमिकेत पाहणे सुखद ठरते. नवोदित अनिरुद्ध दवेसह अभिनेत्री सुहा गिझेनचा सहज वावर ही चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी लिहिलेली गाणी चित्रपटात आहेत आणि त्याला ललित पंडित यांनी दिलेलं संगीतही श्रवणीय आहे. मात्र चित्रपटाच्या पटकथेतच दंगलींचा शोर एवढा आहे की पडद्यावरही शस्त्रं घेऊन मुडदे पाडणारे लोक दिसतात. पण या दंगलींमागचं वास्तव जे आजवर गुलदस्त्यात राहिलं आहे ते या चित्रपटातूनही गुल असल्याने केवळ दंग्यांच्या पाश्र्वभूमीवरची एक प्रेमकथा एवढाच त्याचा मर्यादित अर्थ उरतो.
शोरगुल
दिग्दर्शक – जितेंद्र तिवारी
कलाकार – जिम्मी शेरगिल, आशुतोष राणा, हितेन तेजवानी, एजाझ खान, अनिरुद्ध दवे, सुहा गिझेन, संजय सुरी, नरेंद्र झा.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2016 रोजी प्रकाशित
चित्ररंग : शोर जास्त, भावना गुल
मुझफ्फरनगरमध्ये २०१३ साली झालेल्या दंग्यांच्या पाश्र्वभूमीवरची कथा ‘शोरगुल’ या चित्रपटात रंगवण्यात आली आहे.
Written by रेश्मा राईकवार
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-07-2016 at 02:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shorgul movie review