शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दिलवाले’ हा चित्रपट रविवार, ५ जून रोजी रात्री आठ वाजता सोनी मॅक्स वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. रोहित शेट्टी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मधु इथे अन् चंद्र तिथे
विनोदाची मेजवानी असलेल्या ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या चित्रपटातील गाण्यांच्या संगीताचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते हे प्रकाशन झाले. या वेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. संजय झणकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात आनंद इंगळे, भाऊ कदम, किशोर चौघुले, विशाखा सुभेदार आदींसह ऋतुराज फडके व शाश्वती पिंपळीकर ही नवी जोडी आहे. येत्या १२ जून रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी सहा वाजता चित्रपटाचे प्रसारण झी टॉकीजवरून केले जाणार आहे.
गोवा महोत्सवात ‘हाफ तिकीट
गोवा चित्रपट महोत्सवात आगामी ‘हाफ तिकीट’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच चित्रपटाची पहिली झलक (ट्रेलर)ही महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक समीर कक्कड, निर्माते नानूभाई सिंघानिया, कलाकार प्रियांका बोस, बाल कलाकार शुभम मोरे, विनायक पोतदार हे उपस्थित राहणार आहेत. चित्रपट येत्या १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
सोनूने एकच गाणे दोनदा गायले
‘चिटर’ या चित्रपटासाठी सोनू निगमने एकच गाणे दोनदा गायले. चित्रपटात वैभव तत्त्ववादी व पूजा सावंत यांच्यावर ‘मन माझे’ हे गाणे चित्रित झाले आहे. या गाण्यावरील तांत्रिक काम एका स्टुडिओत सुरू होते. सोनू निगम अन्य कामासाठी तेथे आला होता. त्या वेळी त्याने हे गाणे पाहिले व ऐकले. ते पाहून आपण गायलेले ते गाणे सोनूने रद्द करायला लावले. या गाण्यावर वैभव व पूजा या दोघांनी उत्तम अभिनय केला असून त्या तोडीचे गाणे आपण गायलेलो नाही, असे सांगून गाण्याचे संगीतकार अभिजित नार्वेकर यांना ते पुन्हा ध्वनिमुद्रित करायला सांगितले आणि थोडय़ा वेळात ते गाणे पुन्हा नव्याने ध्वनिमुद्रित करण्यात आले. हा चित्रपट येत्या १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘बर्नी’च्या गाण्यांचे प्रकाशन
ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या कादंबरीपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ‘बर्नी’ या चित्रपटातील गाण्यांचे तसेच चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले. चित्रपटाचे दिग्दर्शन नीलिमा लोणारी यांनी केले असून तेजस्विनी लोणारी, नीलकांती पाटेकर, सविता मालपेकर, गिरीश परदेशी आदी कलाकार चित्रपटात आहेत. या वेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा