कुठल्या तरी झाडावर, कुठल्या तरी खांबावर नाही तर कु ठल्या तरी भिंतीचा आधार घेऊन उभ्या राहिलेल्या मोठमोठय़ा बॅनरवरचे चेहरे जाणाऱ्या-येणाऱ्याकडे रोखून पाहत असतात. पाहणाऱ्याला ते चेहरे त्या बॅनरवर का आहेत, हा प्रश्न नेहमीच छळत राहतो. पण हा एखादा चेहरा बॅनरवर का असेल, कसा आला असेल, त्याचा चेहरा बॅनरवर असल्याने नेमका फायदा कोणाला होणार, अशा एकेका प्रश्नांची उत्तरे मांडत अ‍ॅडमॅन कपिल सावंत यांनी ‘बॅनर’ नावाचा लघुपट केला आहे.
जाहिरात क्षेत्रात अवघ्या काही सेकंदात मोठी गोष्ट सांगण्याचा थोडाथोडका नव्हे चांगला १७ वर्षांचा अनुभव कपिल सावंत यांच्या गाठीशी आहे. ‘बॅनर’ या लघुपटाची कथा दोनच माणसांभोवती गुंफली आहे. अध्र्या तासाच्या या लघुपटात एका पक्षाचा कार्यकर्ता आणि फोटोशॉपवर काम करणारा माणूस या दोघांच्या हलक्याफु लक्या संवादातून बॅनरवरच्या चेहऱ्यांचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न कपिल सावंत यांनी केला आहे. ‘लिओ बर्नेट’सारख्या जाहिरात संस्थेत काम करणाऱ्या कपिल यांनी आजवर ‘कॅडबरी’, ‘मॅकडोनल्ड’, ‘शॉपर्स स्टॉप’सारख्या नामांकित ब्रँड्सचे काम केले आहे. जाहिरात क्षेत्रात काम करीत असलो तरी चित्रपटांचे वेड पहिल्यापासूनच होते, असे सावंत यांनी सांगितले. ‘बॅनर’ करताना अगदी काही मिनिटांचा लघुपट करावा, अशी कल्पना होती, पण जसजशी कथा लिहीत गेलो तसतसा त्याचा विस्तार मोठा आहे हे लक्षात आल्यानंतर तीस मिनिटांचा लघुपट तयार केल्याची माहिती सावंत यांनी दिली.
‘बॅनर’मध्ये अभिनेता सुनील तावडे यांनी राजकीय कार्यकर्त्यांची भूमिका केली आहे, तर शशी रंजन याने फोटोशॉपवर काम करणाऱ्या माणसाची भूमिका केली आहे. ‘ऑप्टिकस इंक’चे संजय शेट्टी आणि केतकी गुहागरकर यांनी लघुपटाच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी सहाय्य केल्याची माहिती सावंत यांनी दिली असून आता त्याच्या प्रदर्शनासाठी विविध वाहिन्यांशी बोलणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ‘बॅनर’बरोबरच कपिल सावंत यांनी दिग्दर्शक रवी जाधवच्या आगामी ‘बँजो’ या हिंदी चित्रपटाचेही सहलेखन केले आहे.  

Story img Loader