एकेकाळी उन्हाळ्याच्या सु्ट्टय़ा सुरू झाल्या की दोन गोष्टींचे वेध लागायचे, एकतर मामाच्या गावाला जायचे आणि दुसरं म्हणजे बालनाटय़ पाहायचे. त्या वेळी बालनाटय़ांची मेजवानी असायची. बालनाटय़ातून फक्त मनोरंजन नाही तर प्रबोधनही व्हायचं आणि त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे बालप्रेक्षक तयार व्हायचे, त्यामुळे कालांतराने व्यावसायिक नाटकांना प्रेक्षकांची उणीव भासायची नाही. कालानुरूप या गोष्टींमध्ये बदल झाला. लहानग्यांच्या हातात स्मार्टफोन आले आणि त्यांनी आपलं स्वत:चं कृत्रिम मनोरंजनाचं साधन शोधलं. त्यामुळे आजी-आजोबांच्या गोष्टी दुरापास्त झाल्या, इसापनीती पुस्तकातच राहिली. त्या राजकन्या, चेटकीण, निसर्गाच्या गोष्टींची जागा आता व्हिडीओ गेम्सने घेतली आणि बालनाटय़ांवर मरगळ आली. पण फक्त स्मार्टफोन ही एकमेव गोष्ट यासाठी कारणीभूत नाही, तर पालकांची बदललेली मानसिकता आणि बालनाटय़ शिबिरांचा भरलेला मागणी तसा पुरवठा करणारा बाजारही जबाबदार आहे.

१९८० सालापासून बालनाटय़ाला तुफान प्रतिसाद मिळायला लागला. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या दिग्गजांनी बालनाटय़ फुलवण्याचं महत्त्वपूर्ण काम केले. पण २००४ सालानंतर बालनाटय़ाकडे येणारा प्रेक्षकवर्ग आटत गेला. इंटरनेट माध्यम, मल्टीप्लेक्स संस्कृती, गॅझेट्स यांच्यामुळे बालनाटकांचा प्रेक्षक कमी झाला. सध्याच्या घडीला व्यावसायिक बालनाटय़ करणाऱ्या संस्था फारच कमी उरल्या आहेत. पण शिबिरांचा मात्र सुळसुळाट सुरू झाला आहे.

सध्याच्या पालकांना आपला मुलगा बालनाटय़ात काम करावा, असेच वाटते. त्यामुळे सारेच शिबिरांकडे वळतात. या शिबिरांमध्ये काही काळ प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांचे नाटक बसवले जाते. शिबीर घेणाऱ्या व्यक्ती बालनाटय़ांचे प्रयोग लावतात आणि तिकिटं पालकांच्या माथ्यावर मारतात. पालकही आपला मुलगा नाटकात दिसणार म्हणून तिकिटे सहज खपवतात. या साऱ्या बाजारूपणामुळे बालनाटय़ांचा दर्जा लयाला चालला आहे. पूर्वीच्या घडीला बालनाटय़ात काम करणं सोपं नव्हतं, शिबिरांनी ते सुलभ केलं. पण काही तोतया शिबीर घेणाऱ्या संस्थांनी बालनाटय़ ही संकल्पना भ्रष्ट केली आहे. ‘१९७०-९० या काळात बालप्रेक्षक नाटकांना यायचे. पण सध्या पालकांची मन:स्थिती बदलली आहे, बालप्रेक्षक होण्यापेक्षा माझ्या मुलाने नाटक करावं, असं त्यांना वाटतं. त्यामुळे शिबिरांची संख्या वाढली आणि बालनाटय़ सादर करण्याची संख्या कमी झाली. सध्याच्या घडीला मुलाला नाटकात काम करणं सोपं आहे, पण बालप्रेक्षक मिळवणं दुरापास्त झालं आहे. शालेय रंगभूमीवर फक्त स्पर्धात्मक नाटकं दिसतात. समस्याप्रधान नाटकं सादर होतात. मोठय़ांचे विषय हाताळले जातात. मनोरंजन हा भाग त्यामध्ये कुठेच राहिला नाही. त्यामुळे स्पर्धात्मक बालनाटकांना प्रेक्षकांची गर्दी होत नाही. दहशतवाद, दंगल हे विषय बालरंगभूमीवर सादर झाले तर तिकीट काढून ते कोण बघायला येईल? बालप्रेक्षकांचा कुणीही विचार करताना दिसत नाही. बालप्रेक्षकाला काय हवंय? हे जाणून घेणं गरजेचं आहे. बालप्रेक्षक वाढवण्यासाठी चळवळ करणं आवश्यक आहे. त्यासाठी तिकीट दर कमी ठेवून नाटकांचा दर्जा वाढवावा लागेल. शाळांचे सहकार्य घ्यावे लागेल. आम्ही शाळेतल्या मुलांना तिकीट दरात सवलत देतो, काही घटकांना आमची संस्था मोफत नाटकं दाखवतो. बालप्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचायला हवं, यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे. शासन राज्यनाटय़ स्पर्धा घेते, पण त्याचबरोबर बालप्रेक्षक वाढवण्यासाठी कार्यक्रम आखण्याची गरज आहे, तरंच बालप्रेक्षकांची संख्या वाढेल. बालरंगभूमीवर प्रधान समस्या प्रेक्षकांची आहे, ही समस्या सोडवली नाही तर बालरंगभूमी संपेल,’ असं बऱ्याच वर्षांपासून बालरंगभूमीवर काम करणारे राजू तुलालवार सांगत होते.

काही वर्षांपूर्वी बालप्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी कार्टून्सच्या नावाने बालनाटय़ं सादर केली जायची. सुरुवातीला काही काळ या गोष्टी बालप्रेक्षकांना आवडल्या, पण कालांतराने त्याचा कंटाळा यायला लागला. मागणी तसा पुरवठा केला की अशा गोष्टी घडायच्याच. या वर्षी तुलनेत बालनाटकांची संख्या घटलेली पाहायला मिळते. पण काही नवीन बालनाटय़ं कसदार आहेत.

पुण्यातील नाटय़संस्कार कला अकादमी ही गेल्या ३८ वर्षांपासून बालरंगभूमीवर कार्यरत आहे. प्रकाश पारखी यांनी गेल्या ३८ वर्षांत सर्जकपणे काम करत ही संस्था टिकवली आहे. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, लोकेश गुप्ते, योगेश सोमण ही नावाजलेली मंडळी या संस्थेत बाळकडू घेऊनच बाहेर पडली आहेत. सध्याच्या घडीला या संस्थेचं ‘आजोबांच्या धमाल गोष्टी’ हे नाटक जोरात सुरू आहे. आजची लहान मुलं मोबाइलमध्ये गुंतलेली असतात, त्यामधून त्यांना बाहेर काढून आजी-आजोबांच्या जवळ नेऊन एका अद्भुत विश्वात नेण्याचा प्रयत्न हे बालनाटय़ करत आहे. ही संस्था बालनाटय़ शिबीर घेते, बालनाटय़ सादरही करते, त्याचबरोबर बालनाटय़ाच्या स्पर्धाही आयोजित करते.

‘आम्ही फक्त बालनाटय़ सादर करण्यापर्यंत येऊन थांबलेलो नाही, तर आम्ही बालनाटय़ाच्या पुस्तकाचं प्रकाशनही करतो. बालनाटय़ाच्या पुस्तकांचं प्रकाशन करणारी ही महाराष्ट्रातील जवळपास एकमेव संस्थाच असावी. पुस्तकांबरोबर आम्ही बालनाटय़ांच्या डीव्हीडीही प्रकाशित केल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही २५ वर्षांपासून बालनाटय़ स्पर्धा घेत आहोत. शालेय जीवनात नृत्य, संगीत, चित्रकला यांच्या परीक्षा होतात, त्यांचे गुण मिळतात. त्याचबरोबर यामध्ये नाटकाचाही समावेश करायला हवा, असे आम्हाला वाटते. नाटकांच्या परीक्षांमुळे व्यक्तिमत्त्व विकास होईल. त्यामुळे आम्ही नाटकासाठी शालेय अभ्यासक्रम तयार केला आहे. शालेय जीवनात नाटकांच्या परीक्षा घ्यावात, अशी शासनाला आम्ही विनंती करणार आहोत,’ असे प्रकाश पारखी सांगत होते.

मराठी रंगभूमीवर प्रेक्षक कमी होत चालला आहे, अशी ओरड आपण ऐकतो. त्याचे एक कारण बालरंगभूमीकडे होत असलेले दुर्लक्ष, हेदेखील आहे. प्रत्येक मुलगा कीर्तिवंत क्रिकेटपटू, कलाकार बनू शकतो, असं नाही. तर त्या मुलामध्ये कोणते गुण आहेत आणि त्याला काय बनण्याची इच्छा आहे, हेदेखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मुलाने बालनाटय़ात काम करायलाच हवे, हा अट्टहास पालकांनी सोडायला हवा. आपला मुलगा दर्दी प्रेक्षक का होऊ शकत नाही, याचा विचार त्यांनी करायला हवा. प्रेक्षकही नाटकाचाच एक भाग आहे आणि त्याच्याशिवाय कोणतंही नाटक चालू शकत नाही, हेदेखील लक्षात घेणं गरजेचं आहे. पण जर पालकांचा हा आडमुठेपणा कायम राहिला तर त्याचा फायदा घेणाऱ्या काही बनावट नाटय़निर्मिती संस्था आहेतच. फक्त पैसा कमवून बालरंगभूमीची वाताहत करण्यात हातखंडा असलेल्या या संस्थांना तुम्हीच धडा शिकवू शकता. बालरंगभूमी वाचली तर मराठी रंगभूमी तग धरेल, हे साधं गणित आहे, यामध्ये आता तुम्ही कसा वाटा उचलता हे महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader