‘एक व्हिलन’ आणि ‘हैदर’सारख्या चांगल्या चित्रपटांमधून आपला प्रभाव पाडणारी श्रद्धा कपूर काहीही न बोलता हळूहळू आपल्या कामाच्या जोरावर एके क शिडी वर चढते आहे. गेल्या वर्षी दोन हिट चित्रपट देऊनही श्रद्धाने इम्रान हाश्मीबरोबर ‘डान्स बसंती’सारखा आयटम साँगचा प्रयोग करत वेळ आली तर त्यातही आपण मागे नाही हे दाखवून दिले होते. या वर्षांच्या सुरुवातीलाच श्रद्धाने चित्रपट आणि जाहिरात दोन्ही गोष्टींत कतरिना कैफ, अलिया भट्ट दोघांनाही मात दिली आहे.
आत्तापर्यंत नव्या फळीतील आश्वासक अभिनेत्री म्हणून अलिया भट्टपाठोपाठ श्रद्धा कपूरनेही आपला नावलौकिक टिकवून ठेवला आहे. ‘आशिकी २’च्या यशानंतर श्रद्धाने केलल्या प्रत्येक चित्रपटाला तिकीटबारीवर तर यश मिळालेच. शिवाय, तिच्या कामाचीही प्रशंसा झाली आहे. त्यामुळे जाहिरातींसाठी आता तिचा विचार होऊ लागला असून गेली सात वर्षे कतरिना ज्या ब्रँडची जाहिरात करत होती. त्या ब्रँडसाठी श्रद्धाची निवड झाली आहे. ‘मी गेली कित्येक वर्षे जो ब्रँड वापरते आहे त्याची जाहिरात करायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही’, असे श्रद्धाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे चित्रपटांच्या बाबतीतही तिने आघाडी घेतली आहे. आपल्या नृत्यकौशल्याच्या बळावर ती वरुण धवनबरोबर रेमोच्या ‘एबीसीडी २’ चित्रपटात काम करते आहे. सध्या नव्या फळीत ती आणि अलिया दोघीही आपल्या गानकलेसाठी प्रसिद्ध आहेत. दोघींनीही आपापल्या चित्रपटांमधून गाणी गायली आहेत आणि दोघींचेही त्यासाठी कौतुक झाले आहे. मात्र, म्युझिक बँडवर बेतलेल्या ‘रॉक ऑन २’मध्ये अलियाऐवजी श्रद्धाची वर्णी लागली आहे. फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पूरब कोहलीसारख्या कलाकारांना गाजवलेल्या ‘रॉक ऑन’ चित्रपटाच्या सिक्वलची सध्या जोरात तयारी सुरू आहे.
पहिल्या चित्रपटातील कलाकार सिक्वलमध्येही कायम आहेत. मात्र, त्यात काही नव्या चेहऱ्यांची भर पडणार आहे. ‘रॉक ऑन २’साठी पहिल्यांदा अलियाचा विचार सुरू करण्यात आला होता.
मात्र, ऐनवेळी निर्माता-दिग्दर्शक यांनी अलियाऐवजी श्रद्धाला पसंती दिली आहे. ‘रॉक ऑन’ हा माझा सगळ्यात आवडता चित्रपट आहे. सिक्वलमध्ये माझ्या वाटय़ाला जी भूमिका आली आहे ती खूपच चांगली आहे. शिवाय, या भूमिकेसाठी गाणे आणि प्रत्यक्ष सादरीकरण दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत.
एकाच चांगल्या चित्रपटात इतक्या साऱ्या आव्हानात्मक गोष्टी करण्याची संधी फार कमीजणांच्या वाटय़ाला येते. ‘रॉक ऑन २’च्या निमित्ताने आपल्याला चांगली संधी चालून आल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा