प्रदर्शनापूर्वी नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाममध्ये ठसा उमटवलेला ‘टपाल’ हा मराठी चित्रपट २६ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची स्क्रिनिंग सोहळा नुकताच झाला. ‘टपाल’ च्या स्क्रिनिंगला बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री श्रीदेवी ही पती बॉनी कपूर आणि मुलगी जान्हवीसह उपस्थित राहिली होती. ‘टपाल’ चित्रपट पाहिल्यानंतर श्रीदेवीने ट्विटवरून याची प्रशंसा केली. तिने ट्विट केले की, “आताच मराठी चित्रपट ‘टपाल’ पाहिला. खूप दिवसांनंतर डोळ्यांत पाणी आले. प्रत्येकाने बघावा असा हा चित्रपट आहे.“
Just watched Marathi film “Tapal”. After a long time, was teary eyed & emotionally choked. Must watch film for all. pic.twitter.com/HaL0jFVsgQ
— Sridevi Boney Kapoor (@SrideviBKapoor) September 21, 2014
यापूर्वी अभिनेता अक्षय कुमारनेही टपाल चित्रपट अवश्य पाहा असे आवाहन केले होते. हिंदी चित्रपटातील सिनेमॅटोग्राफर लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून वर्षां मधुसूदन सत्पाळकर या निर्मात्या आहेत. या चित्रपटातून पोस्टमन, त्याची पत्नी आणि मुलगा यांचे भावविश्व साकारण्यात आले आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर दक्षिण कोरियातील बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आला होता. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री वीणा जामकर यांना दक्षिण आफ्रिकेत ‘इफ्सा’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. चित्रपटाची कथा, पटकथा मंगेश हाडवळे यांची असून नंदू माधव, वीणा जामकर, उर्मिला कानेटकर, गंगा गोगावले, जयवंत वाडकर, बालकलाकार रोहित उतेकर हे कलाकार आहेत