सध्या देशभरामध्ये #MeToo च्या मोहिमेने चांगलाच जोर धरला असून या अंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींची नावंही समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. पाहायला गेलं तर याविषयी फारसं कोणी वक्तव्य करताना दिसत नाही. परंतु आता मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने तिचं मत मांडलं आहे.
#MeToo अंतर्गंत नाना पाटेकर, विकास बहल, आलोक नाथ, साजिद खान, चेतन भगत, पियुष मिश्रा आणि आता ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. याविषयी श्रेयाने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिचं मत मांडलं आहे.
#MeToo या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळे ही मोहीम चांगलीच आहे. परंतु अत्याचार हे केवळ महिलांवरच होत नाहीत तर ते पुरुषांवरदेखील होतात. त्यामुळे महिलाच नाही पुरुषही #MeToo चे बळी आहेत. मात्र त्याकडे फारसं कोणी पाहत नाहीये. खरतर आता #MeToo या मोहिमेचा उद्देश बाजूला पडला आहे. ही मोहीम नक्की कशासाठी आहे हे लोकांना समजत नाहीये. या मोहीमेच्या माध्यमातून पुरुषदेखील त्यांच्या अन्यायाला वाचा फोडू शकतात, असं श्रेया म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, सध्या बॉलिवूडमधील प्रकरणं समोर येत आहेत. परंतु लैंगिक अत्याचार केवळ याच क्षेत्रात होत नाहीये. अत्याचार हे प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतात. मात्र आपण त्याच वेळी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. अनेक जण यावियषी व्यक्त होत आहेत. काही जण खरंच त्यांच्या अन्यायाचं कथन करत आहेत. परंतु काही जण टीआरपीसाठीदेखील करत असतील. पण खरं कोण आणि खोटं कोण हे मी सांगू शकत नाही.