ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री श्रेया बुगडे हिने विक्रम गोखले यांच्याबद्दल एक पोस्ट लिहिली. या पोस्टच्या माध्यमातून विक्रम गोखले यांच्या आठवणीत भावूक झाली.
श्रेयाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून विक्रम गोखले यांच्याबरोबरचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्याबद्दल तिला वाटणारे प्रेम आणि आदर व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. तिने लिहिले, “विक्रम काका…खूप काही राहून गेलं…तुम्ही माझ्यासाठी जे लिहिणार होतात त्यात काम करणं राहून गेलं, तुमच्या घरी येऊन गप्पा मारायच्या राहून गेल्या, केदार आणि तुमच्यासोबत AK स्टुडिओसच्या मुलांसाठी वर्कशॉपचा कायमचा भाग होणं राहून गेलं. तुम्ही कलाकार किंव्हा नट म्हणुन काय होतात ह्यावर मी बोलणं मला योग्य वाटत नाही…पण आपल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रत्यक्ष झालेल्या भेटीत तुम्ही माझ्या आयुष्यातले अत्यंत मौल्यवान आणि अविस्मरणीय क्षण देऊन गेलात…”
पुढे ती म्हणाली, “तुम्ही माझं, माझ्या कामाचं भरभरून केलेलं कौतुक एक कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात कमालीचा आनंद, ऊर्जा आणि समाधान देणारं ठरलं. १७ जुलै ला पुण्यात ‘भरत’ ला @akstudiopune च्या लेक्चरच्या निमित्तानी झालेली ती २/ २.३० तासांची आपली भेट, तुमचा लाभलेला सहवास.. विंगेत चहा पीत तुमच्याशी मारलेल्या गप्पा…मनामध्ये खूप जागा व्यापून आहे…कायम राहील…’Man watching’ आता मी वाचणार आहे आणि तुम्हला माझा अजून अभिमान वाटेल असं काम करणार आहे! तुम्ही प्रेमानी केलेले कौतुकाचे मेसेज कायम जपुन ठेवणार आहे. तुम्ही आधीच आम्हाला खुप दिलं आहे… इथून पुढेही तसंच होईल.”
दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा : Photos: विक्रम गोखलेंच्या निधनाने शोककळा, अंतिम दर्शनावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचेही गोखले मानकरी होते. त्यांच्या निधानाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.