झी मराठीवरील ‘चल भावा सीटीत’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा बॉलीवूड व मराठी अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). या कार्यक्रमातून श्रेयस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मात्र आता त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अभिनेता एका आर्थिक प्रकरणामुळे कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. श्रेयस तळपदेविरोधात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रेयस तळपदेसह इतर १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांना गुंतवणुकीवर दामदुप्पट करून देण्याची योजना सांगण्यात आली होती. आयएएनएसच्या वृत्तानुसार, या आरोपींनी ‘द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ नावाच्या कंपनीशी सहकार्य करून गावकऱ्यांना चांगला परतावा देण्याचा दावा केला आणि त्यांच्याकडून गुंतवणूक म्हणून पैसे घेतले.
गुंतवणूक दुप्पट होईल या दाव्यावर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले, तेव्हा कंपनीच्या एजंट्सनी त्यांचे कामकाज बंद केले आणि जिल्ह्यातून गायब झाल्याचे वृत्त आहे. या आर्थिक फसवणुकीसंदर्भात श्रेयस तळपदेचे नाव आले आहे. पण हे नाव येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
फेब्रुवारी महिन्यात श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्याविरुद्ध लखनऊमध्ये गुंतवणूकदारांची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आले आहे.
हिंदुस्तान टाईम्सनुसार, या कथित घोटाळ्यात अनेक लोकांनी कोट्यवधी रुपये जमा केले. मुदत संपल्यानंतर जेव्हा कंपनीकडून पैसे मागितले गेले तेव्हा कंपनीने निरर्थक उत्तरे दिली. त्यानंतर कंपनी बंद पडली आणि कंपनीचा लोकांशी संपर्क तुटला. त्यामुळे गावकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली.
या प्रकरणी कंपनीचे समीर अग्रवाल, त्यांची पत्नी सानिया, मुंबईतील रहिवासी आर के शेट्टी, संजय मुदगील, श्रेयस तळपदे, ललित विश्वकर्मा, दलचंद्र कुशवाह, सुनील विश्वकर्मा, सचिन रकवार, कमल रक्वार, सुनील कुमार, महेश राकवार, राजेंद्र नाना कुमार, राजकुमार जी, राजेंद्र नाना देव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी श्रेयसकडून अजून कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही. त्यामुळे आता याबद्दल त्याची नेमकी भूमिका काय आहे? या प्रकरणात त्याचा सहभाग आहे का? याबद्दल त्याचे मत समोर येणे गरजेचे आहे. ज्याची चाहते मंडळी वाट पाहत आहेत.