‘झुकेगा नहीं’ म्हणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘पुष्पा’ म्हणजेच अल्लू अर्जुन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कोविड काळात या चित्रपटाचा पहिला भाग आला होता ज्याला प्रेक्षकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. आता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदीतही प्रचंड गाजला. मूळ तेलुगूमधील या चित्रपटाला हिंदीमध्ये प्रदर्शित करताना अल्लू अर्जुनच्या पात्राला मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने आवाज दिला. जेवढी चर्चा अल्लू अर्जुनची झाली तेवढीच चर्चा श्रेयस तळपदेच्या आवाजाची झाली. आता ‘पुष्पा २’मुळे पुन्हा एकदा श्रेयस चर्चेत आला आहे. याच्या दुसऱ्या भागाबद्दल एक मोठी अडपेट श्रेयसने शेअर केली आहे.

आणखी वाचा : आमिर, शाहरुख अन् सलमान एकत्र येणार? मिस्टर परफेक्शनिस्टनेच केला मोठा खुलासा

पहिल्या भागाप्रमाणेच या दुसऱ्या भागासाठीही श्रेयस अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज देणार की नाही याबद्दल त्याने भाष्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये श्रेयस म्हणाला, “माझी खूप इच्छा आहे की मीच त्यांचा आवाज बनू, परंतु अजूनही ते चित्रीकरण करत आहे. जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा पुढे आमचं काम सुरू होईल. या चित्रपटासाठी डबिंग करायची माझी इच्छा आहे, परंतु निर्माते व माझ्यात याबद्दल काहीच बोलणी झालेली नाहीत.”

पुढे श्रेयस म्हणाला, “मी आशा करतो की लवकरच निर्माते माझ्याशी याबद्दल बोलतील. कदाचित पुढील महिन्यात चित्रीकरण संपल्यावर आमचं याबाबतीत बोलणं होऊ शकेल. जर निर्मात्यांची इच्छा असेल मी यासाठी डब करावं तर मी आनंदाने यासाठी तयार आहे. माझी खूप इच्छा आहे पण हा पूर्णपणे निर्मात्यांचा निर्णय आहे.” अल्लू अर्जुन सध्या विशाखापट्टणममध्ये ‘पुष्पा २’ च्या शेड्यूलसाठी शूटिंग करत आहे. चित्रपटाचे काही सीक्वेन्स शूट झाले आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade he will give his voice to allu arjuns pushpa 2 only if makers wanted him avn